मुंबई : राज्यातील पेट्रोलियम वितरकांकडून ग्राहकांना कमी तेलाची विक्री करुन ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे तपासणीमध्ये आढळून आल्यामुळे 7 पेट्रोलपंप जप्त करुन 6 वितरकांविरुद्ध खटले नोंदविण्यात आले आहेत. राज्यातील सर्व पेट्रोलियम वितरकांची तपासणी करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस महासंचालक तथा नियंत्रक वैधमापन शास्त्र अमिताभ गुप्ता यांनी यंत्रणेतील संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.
राज्यातील 1636 पेट्रोल/डिझेल वितरकांच्या तपासणीत 11418 पंपाची तपासणी करण्यात आली असून तसेच 252 पंपाद्वारे कमी- जास्त वितरण होत असल्याचे आढळल्याने अनुसूची 10 नुसार नोटीस देऊन बंद करण्यात आले आहे व हे पंप पुनर्पडताळणी व मुद्रांकन केल्यानंतर वापरास खुले करण्यात येणार असून या तपासणीत उल्लंघनाबाबत 17 खटले नोंदविण्यात आले आहेत.
तपासणीत मुंबई महानगर विभागाच्या 145 वितरकांची तपासणी करुन 1734 पंप तपासण्यात आले. यामध्ये 2 पंप कमी वितरणामुळे बंद करुन एका वितरणाविरुद्ध खटला नोंदविण्यात आला आहे. पेट्रोलियम पदार्थांचे कमी वितरण करुन ग्राहकांची फसवणूक करण्यामध्ये मे.चारकोप पेट्रोलियम, महावीर नगर, कांदिवली (प) या वितरकाचा समावेश आहे. एकूण 41 पंपातील त्रुटींमुळे त्यांना नोटीस देऊन बंद करण्यात आले आहे.
कोकण विभागामध्ये 160 वितरकांची तपासणी करुन 1202 पंप तपासण्यात आले. यामध्ये एक पंप कमी वितरणामुळे बंद करुन एकाविरुद्ध खटला नोंदविण्यात आला आहे. 30 पंपातील त्रुटींमुळे त्यांना नोटीस देऊन बंद करण्यात आले आहे. पेट्रोलचे कमी वितरण करुन ग्राहकांची फसवणूक करणा-या मे.जाई ऑटोमोबाइल्स, देहाले, पो.पडघा, ता.भिवंडी या वितरकावर कारवाई करण्यात आली आहे.
पुणे विभागात 377 वितरकांची तपासणी करुन 2511 पंप तपासण्यात आले. 2 पंप कमी वितरणामुळे बंद करुन 2 वितरकांविरुद्ध खटला नोंदविण्यात आला. 17 पंपातील दोष आढळून आल्यामुळे त्यांना नोटीस देऊन बंद करण्यात आले आहे. पेट्रोलचे कमी वितरण करणा-या ग्राहकांची फसवणूक करण्या-या मे.सिद्धीविनायक पेट्रोलियमवर (सांडगेवाडी, कराड तासगाव रोड, ता.पुळुस, जि.सांगली) कारवाई करण्यात आली.
नाशिक विभागामध्ये 322 वितरकांची तपासणी करुन 2000 पंप तपासण्यात आले. यामध्ये 2 पंप कमी वितरणामुळे बंद करुन 2 वितरकांविरुद्ध खटला नोंदविण्यात आला. 99 पंपातील दोषामुळे नोटीस देऊन बंद करण्यात आले.औरंगाबाद विभागामध्ये 290 वितरकांची तपासणी करुन 1661 पंप तपासण्यात आले. यामध्ये 27 पंपातील दोषामुळे नोटीस देऊन बंद करण्यात आले. अमरावती विभागात 180 वितरणाची तपासणी करण्यात आली असून 1181 पंप तपासण्यात आले. यामध्ये 21 पंपातील त्रुटीमुळे नोटीस देऊन बंद करण्यात आले. नागपूर विभागामध्ये 162 वितरकांची तपासणी करुन 1129 पंप तपासण्यात आले. यामध्ये 17 पंपातील त्रुटींमुळे नोटीस देऊन बंद करण्यात आले.
वितरणाबाबत शंका आल्यास प्रमाणित मापाद्वारे तपासणी करावी
ग्राहकांनी वितरणाबाबत शंका असल्यास अचूक वितरणाची खात्री करण्यासाठी पंपावर उपलब्ध असलेल्या 5 लीटर प्रमाणित मापाद्वारे तपासणी करावी. विधीग्राह्य त्रुटींपेक्षा म्हणजे 25 मिलीपेक्षा जास्त कमी वितरण होत असल्याचे निदर्शनास आल्यास याबाबत ग्राहकांनी क्षेत्रिय वैधमापन शास्त्र विभागाशी संपर्क साधावा किंवा यंत्रणेच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र.022-22886666 असून ई-मेल dclmms_complaints@yahoo.com या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन अप्पर पोलीस महासंचालक तथा नियंत्रक वैद्यमापन शास्त्र अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.