राजगुरुनगर : येथील खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात हुतात्मा राजगुरुंच्या जयंतीचे औचित्य साधून हुतात्मा राजगुरू मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे 310 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांसाठीची स्पर्धा सहा किलोमीटर अंतराची होती. यामध्ये 230 विद्यार्थी सहभागी झाले. त्यात प्रथम क्रमांक वैभव होले याने पटकाविला. त्याने हे अंतर 14 मिनिटात पूर्ण केले. द्वितीय क्रमांक संतोष मेठल याने तर तृतीय क्रमांक मयूर राक्षे याने पटकाविला. विद्यार्थिनींसाठीची स्पर्धा तीन किलोमीटर अंतराची होती. त्यामध्ये 80 विद्यार्थिनी सहभागी झाल्या. प्रथम क्रमांक ज्ञानेश्वरी थिटे हिने पटकाविला. द्वितीय क्रमांक उज्ज्वला मोरे तर तृतीय क्रमांक शीतल दौंडकर हिचा आला. या सर्व यशस्वी गुणवंत स्पर्धकांना संस्थाध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यांची होती उपस्थिती
संस्थेचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेच्या निमित्ताने ’परिसर स्वच्छ ठेवू, आरोग्यासाठी धावू’ हा सामाजिक संदेश देण्यात आला. याप्रसंगी संचालक मुरलीधर खांगटे, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. व्ही. डी. कुलकर्णी, डॉ. संजय शिंदे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. जी. जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे आदी मान्यवर उपस्थित होते.
संयोजनात यांचा हातभार
या स्पर्धेसाठी ग्रामीण रुग्णालय चांडोली यांच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली होती. खेड पोलीस स्टेशनच्या वतीने सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. महाविद्यालयातील जिमखाना विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेचे आयोजन शारीरिक शिक्षण संचालक प्रा. प्रतिमा लोणारी, प्रा. टी. एस. पिंगळे, प्रा. एस. बी. गोरे, प्रा. वाय. बी. मोहिते यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. व्ही. बी. दौंडकर यांनी केले तर आभार प्रा. प्रतिमा लोणारी यांनी मानले.