लंडन । आयसीसी वन-डे क्रिकेटपटूंच्या मानांकनामध्ये टॉप 10 मध्ये भारताच्या केवळ विराट कोहलीला स्थान मिळवता आले आहे. त्याने फलंदाजांच्या क्रमवारीत तिसरे स्थान कायम राखले आहे. अव्वल तीन फलंदाज एबी डीव्हिलियर्स (874 मानांकन गुण), डेव्हिड वॉर्नर (871 मानांकन गुण) आणि विराट कोहली (852 मानांकन गुण) यांच्यामध्ये केवळ 22 अंकांचा फरक आहे. फलंदाजांच्या यादीमध्ये अव्वल 20 मध्ये रोहित शर्मा (12 वे स्थान), महेंद्रसिंह धोनी (13 वे स्थान) आणि शिखर धवन (15 वे स्थान) यांचा समावेश आहे. धवनची दोन स्थानाने घसरण झाली आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत एकही भारतीय अव्वल 10 मध्ये नाही. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा कॅगिसो रबाडा अव्वल स्थानी आहे. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीसोबत संयुक्तपणे 11 व्या स्थानी, तर अमित मिश्रा 13 व्या स्थानी आहे. या दोन्ही खेळाडूंचा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश नाही. रविचंद्रन आश्विन संयुक्तपणे 18 व्या स्थानी आहे. अव्वल तीन गोलंदाजांमध्ये रबाडा (724 मानांकन गुण), इम्रान ताहिर (722 मानांकन गुण) आणि मिशेल स्टार्क (701 मानांकन गुण) यांच्यादरम्यान केवळ 23 मानांकन गुणांचे अंतर आहे. गुणांचा फरक कमी असल्याने टीम इंडियाला नंबर वन होण्याची संधी आहे. टीम आणि वैयक्तिक मानांकनासाठी चुरस असल्यामुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित होते. या स्पर्धेत अव्वल आठ संघांचा सहभाग आहे. त्यातील मानांकनामध्ये आघाडीच्या संघांमध्ये आणि खेळाडूंदरम्यान विशेष फरक नाही.