जळगाव । समाजकल्याण विभागाच्या विविध वैयक्तिक योजनांच्या लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागामार्फत लाभाची रक्कम देण्यात येत असते. मात्र संपूर्ण जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याने अर्थ विभागाकडून लाभाची रक्कम मिळण्यास विलंब होत असते. वैयक्तिक लाभार्थ्यांना त्वरीत लाभ मिळावा यासाठी लाभाची रक्कम पंचायत समिती गटविकास अधिकार्यांमार्फत वितरीत करण्यात यावे या विषयावर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या सभेत करण्यात आली.
बुधवारी 6 रोजी समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांच्या दालनात समाजकल्याण समितीची सभा घेण्यात आली. यावेळी सर्व सदस्य, समाजकल्याण अधिकारी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. बीडीओंमार्फत निधी वाटप करण्यात यावे असा प्रस्ताव सीईओं यांच्याकडे पाठविण्यात यावे असा निर्णय यावेळी झाला. दिव्यांगासाठी आरक्षीत असलेल्या 3 टक्के राखीव निधीतून जिल्ह्यातील दिव्यांगासाठी प्रशिक्षण कार्यशाळा, तात्काळ निदान व उपचार शिबीर घेण्यात येणार आहे. त्यासाठी 25 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. पुढील महिन्यात तालुकानिहाय कार्यशाळा घेण्यात येणार असून दिव्यांगांना तज्ज्ञ अधिकार्यांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. दरम्यान अपंगांसाठी 1 कोटी 34 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. यात दिव्यांग शाळांना सोयी सुविधा व विद्युतीकरणासाठी 49.90 लाख, दिव्यांगांना सौर कंदील पुरविणे 11 लाख, दिव्यांग विद्यार्थ्यांन गणवेश व शालेय साहित्यासाठी 10 लाख, विवाह प्रोत्साहनासाठी 7.50 लाख, स्वयंरोजगारासाठी कांडप मशिन 11 लाख, ग्रीन जीम पुरविणे 5 लाख, योजना परिचालनासाठी 38 हजाराची तरतूद करण्यात आली आहे.