वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाच्या लाभात गैरव्यवहार !

आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परीषदेकडे केली चौकशीची मागणी : सत्य जनतेपुढे येण्याची अपेक्षा

रावेर : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील रावेर पंचायत समिती येथील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देण्यात येत असलेल्या वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाच्या लाभात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरप्रकार झाल्याच्या मतदारसंघातील ग्रामस्थांच्या तक्रारी असून या प्रकरणी जळगाव जिल्हा परीषदेचे कार्यकारी अधिकारी यांनी त्रयस्त समिती नेमून चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करावे, असे पत्र आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्याने खळबळ उडाली आहे.

आर्थिक गैरव्यवहार झाल्याची ओरड
रावेर तालुक्यात गरीब कुटुंबाना शौचालय बांधकाम करण्यासाठी शासन अनुदान म्हणून बारा हजार रुपये देते परंतु या गरीबांच्या अनुदानात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची ओरड आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रावेर तालुक्यातील स्वछ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक लाभाचे प्रकरण गाजते आहे. प्रकरण दडपण्यासाठी स्वछ भारत मिशन कक्षातील कंत्राटी कर्मचारी यांचा बळी देऊन त्यांच्यावरगुन्हा दाखल करण्याच्या वेगवान हालचाली सुरु असल्याची चर्चा पं.स.रावेर कार्यालयात सुरू आहे मात्र आता या प्रकरणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः लक्ष घातल्याने निःपक्षपातीपणे चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईल, अश्या प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत आहेत .

महिना उलटला पण समितीचा अहवाल दिसेना
रावेर पंचायत समितीतील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देण्यात येणारे वैयक्तिक शौचालयात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची ओरड आहे. या प्रकरणी बीडीओ यांनी त्रीसदस्यीय चौकशी समितीदेखील समितीला सात दिवसांचा अल्टीमेटम होता मात्र एका महिन्यांच्यावर कालावधी उलटून सुध्दा अद्याप अहवाल येत नसल्याचे संशय व्यक्त केला जात आहे. तालुक्यात मागील चार वर्षात सुमारे 18 कोटींच्या वर रक्कम खर्ची पडली आहे.

आमदार चौधरींचे दुर्लक्ष ; जनतेत नाराजी
या वैयक्तिक शौचालयाच्या आर्थिक गैरव्यवहाराकडे शेजारील आमदार चंद्रकांत पाटील यांनी लक्ष देऊन चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करतात परंतु रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांचे या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याने जनतेत नाराजीचा सुर आहे. वैयक्तिक शौचालयाच्या माध्यमातून गरीब कुटुंबाना बारा हजार रुपये अनुदान दिले जाते. याच अनुदानात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.