शौचालय बांधकामात कसूर करणाऱ्या ग्रामसेवकाचे निलंबन
जळगाव : जिल्हाभरातील एलओबी अर्थात पायाभूत सर्व्हेक्षणातून सुटलेल्या कुटुंबियांना वैयक्तिक शौचालयांचा लाभ देण्यासाठी उद्दीष्ट देण्यात आले होते़ मात्र, 31 डिसेंबर नंतर या योजनेत लाभार्थ्यांना अनुदान मिळणार नसल्याने 15 डिसेंबर पर्यंत शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट पूर्ण होणे गरजेचे असल्याने त्याचा आढावा घेण्यासाठी सीईओ वान्मथी सी. यांनी पारोळा येथे अधिकार्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत शौचालय बांधकामात उडवाउडवीची उत्तरे दिल्याने चाळीसगाव तालुक्यातील न्हावे येथील ग्रामसेवक यांना नोटीस देऊन निलंबित करावे, असे आदेश सीईओ वान्मथी सी यांनी दिले़ वैयक्तिक शौचालय बांधकामात समाधानकारक कामगिरी न करणार्या अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, जळगाव तसेच जामनेर या पाच तालुक्यांमधील 38 ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
आठ तालुक्यांचे बीडीओ उपस्थित
बैठकीला यावेळी पाणी व स्वच्छता डेप्युटी सीईओ डी़ आऱ लोखंडे, ग्रामपंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ बी़ ए़ बोट आदींसह अमळनेर, भडगांव, भुसावळ, चाळीसगांव, जळगांव, जामनेर, पारोळा, चोपडा या आठ तालुक्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते़ या बैठकीत असमाधानकारक कामगिरी असलेल्या ग्रामसेवक, बीडिओंना नोटीसा द्याव्यात असे सांगत जामनेर येथील गटविकास अधिकार्यांना नोटीस बजावण्यात येवून त्याच्याकडून खुलास यावा असेही आदेश सीईओ यांनी दिले.
..तर ग्रामसेवकांची वेतनवाढ तत्काळ थांबवावी
ज्या अधिकार्यांच्या अधिकार क्षेत्रात कमी कामे दिसतील त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे़ ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणामुळे जर लाभार्थी वंचित राहिले तर त्यांची वेतनवाढ तात्काळ थांबविण्या यावी असे आदेश त्यांनी दिले़ भुसावळ तालुक्यातील गजोरे ग्रामपंचायतीकडे जागा उपलब्धतेच्या मुद्दयावरून चौकशीचे आदेश देण्यात आले आहे़ शिवाय अमळनेर तालुक्यात असमाधानकारक कामे करणार्या समन्वयकांना कार्यमुक्त का करू नये अशी विचारणा करीत नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत़
15 डिसेंबरपासून टमरेल जप्ती
शौचालय बांधकामाचा विषय ऐरणीवर आला असून बांधूनही लोक ते वापरत नाहीत असे अनेक ठिकाणी निदर्शनास आल्यामुळे आता ही मोहीम गतिमान करण्यासाठी 15 डिसेंब पासून जिल्हाभरात टमरेल जप्तीची मोहीम राबविणार असल्याचे डेप्युटी सीईओ डी़ आर. लोखंडे यांनी सांगितले़ यापुढे उद्दीष्टपुर्तीसाठी मुदतवाढ मिळणार नसल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले़
या ग्रामपंचायतींना नोटीस
वैयक्तिक शौचालय बांधकामात समाधानकारक कामगिरी न करणार्या अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, जळगाव तसेच जामनेर या पाच तालुक्यांमधील 38 ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यात अमळनेर तालुक्यात सारबेटे बु.टेकु खु.,प्रगणे डांगरी, सबगव्हाण, दोधवद, नांदगांव, तलवाडे, शिरुळ भवरस व कळमसरे , चाळीसगाव तालुक्यातील दस्केबरडी, घोडेगांव, हिरापूर, जामदा, जांमडी प्र.ब.. करगांव, मेहुणबारे, ओढरे, ओझर, पिलखोड, पिपलवाळ निकुंभ, पिंप्री खु. सांगवी. उंबरखेडे, वरखेडे बु ,वाघडी, रांजनगांव व बहाळ, चोपडा तालुक्यातील सनपुले जळगाव तालुक्यातील निमगांव बु., दापोरे व लोणवाडी बु,, जामनेर तालुक्यातील वाकोद, तोंडापूर, नेरी बु., नांद्रा हवेली, मोहाडी व मोयगांव बु या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.