नवी दिल्ली : जम्मू येथील माता वैष्णोदेवी दर्शनासाठी जाणार्या भाविकांच्या सोयीसाठी नवा मार्ग खुला करण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. 24 नोव्हेंबरपासून हा नवा मार्ग पादचारी आणि बॅटरीवर चालणार्या कारसाठी खुला करण्याचे आदेश एनजीटीने दिले होते.
न्या. एम. बी. लोकूर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. श्री माता वैष्णोदेवी शिरीन बोर्डाने एनजीटीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 24 नोव्हेंबरपासून नवा मार्ग सुरु करणे शक्य नसल्याचे बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. त्यानुसार, न्यायालयाने हा निर्णय दिला. बोर्डाची बाजू मांडताना वरिष्ठ वकिल मुकूल रोहतगी यांनी न्यायालयात सांगितले की, नव्या मार्गाच्या निर्मितीचे काम अद्याप सुरु असून ते पूर्ण झालेले नाही. पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण होईल, तोपर्यंत हा मार्ग खुला करण्यात येऊ नये. यात्रेकरुंसाठी यापूर्वीचे दोन मार्ग सध्या सुरु आहेत. या नव्या मार्गाचे बोर्डाकडून काम सुरु आहे.