जळगाव। औद्यागिक वसाहत परिसरातील मानस अॅक्वा कंपनीतील वॉचमनने आजाराला कंटाळून राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून जीवनयात्रा संपविल्याची घटना गुरूवारी सकाळी 10.50 वाजेच्या सुमारास घडली. प्रदिप शामराम कोळी (वय-50) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी औद्यागिक वसाहत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कुटूंबिय घराबाहेर असतांना घडली घटना
प्रदिप कोळी हे औद्यागिक वसाहत परिसरातील मानस अॅक्वा या कंपनीत वॉचमन म्हणून कामाला होते. तर कंपनीतील वॉचमन खोलीत ते पत्नी मुली आणि मुलासोबत राहत होते. पत्नी अनिता ह्या देखील औद्यागिक वसाहत परिसरातील एका कंपनीत मुजरी करण्यासाठी जात होत्या. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून ते आजारला त्रासलेले होते. गुरूवारी सकाळी कुटूंबिय घराबाहेर बसलेले असतांनाच प्रदिप यांनी खोलीत सकाळी 10.50 वाजेच्या सुमारास ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. काही वेळात पत्नी घरात गेल्यानंतर त्यांना पती प्रदिप हे गळफास घेतल्याचे दिसताच त्यांनी आरडा-ओरडा केली. परिसरात असलेल्या कंपनीच्या कर्मचार्यांनी त्या ठिकाणी धाव घेत प्रदिप यांना खाली उतरविले. त्यानंतर लागलीच जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ नेले. परंतू वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी केल्यानंतर प्रदिप यांना मृत घोषित केले. याप्रकरणी सीएमओ डॉ. निता भोळे यांच्या खबरीवरून औद्यागिक वसाहत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.