‘वॉटर कप’ स्पर्धेत 30 तालुक्यांचा समावेश

0

पुणे : पाणी फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप 2017’ स्पर्धेतील विजेत्या गावांचा सन्मान मुख्यंमत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 6 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता श्री शिवछत्रपती स्पोटर्स कॉम्प्लेक्स बालेवाडी येथे हा सोहळा होणार आहे. कार्यक्रमाला पाणी फाउंडेशचे सह-संस्थापक अमिर खान तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी किरण राव, फाउंडेशनचे मुख्य मार्गदर्शक अविनाथ पोळ उपस्थित होते.

भटकळ म्हणाले, यावर्षी या स्पर्धेत मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांतील 30 तालुके सामील झाले होते. त्यांपैकी स्पर्धेत विजेेत्या होणार्‍या गावांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. पहिले बक्षीस 50 लाख, दुसरे 30 लाख आणि तिसरे 20 लाख रुपये असणार आहे. याशिवाय प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या गावाला 10 लाख रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

किरण राव म्हणाल्या, लोकांच्या सहभागामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला आहे. राजकीय पार्श्वभूमी बाजूला ठेवत गावातील पुरुष, तरुण विशेषत: स्त्रिया यात सहभागी झाल्याने हा उपक्रम यशस्वी झाला आहे.