वॉर्नरनेही रडत रडत मागितली माफी

0

मेलबर्न । माझ्या आतापर्यंतच्या क्रिकेटमध्ये ज्यांनी मला भरभरून प्रेम दिले, त्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो, असे म्हणत ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तुमचा विश्‍वास परत मिळवण्याचा मी प्रयत्न करेन. या प्रकरणात माझा सहभाग होता याची खंत मला आयुष्यभर सलत राहीन, असेही तो भरल्या डोळ्यांनी म्हणाला. ऑस्ट्रेलियन खेडाळू डेव्हिड वॉर्नरने चाहत्यांची पत्रकार परिषदेत माफी मागितली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग केल्याप्रकरणी डेव्हिड वॉर्नरला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका वर्षाच्या बंदीची शिक्षा सुनावली. नुकताच डेव्हिड ऑस्ट्रेलियात परतला आहे. लाखो चाहत्यांची मने दुखावल्यामुळे आणि ऑस्ट्रेलियाची प्रतिमा जागतिक पातळीवर मलिन केल्याप्रकरणी डेव्हिडने अखेर सर्वांसमोर येऊन माफी मागितली.

स्मिथच्या रडण्यावर बोलला आर अश्‍विन
भारताचा आघाडीचा फिरकी गोलंदाज आर. अश्‍विनने बॉल टेंपरिंग प्रकरणात सापडलेला ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरचे समर्थन केले आहे. त्याने म्हटले की, जग फक्त तुम्हाला रडवते. एकदा का तुम्ही रडले तर ते संतुष्ट होऊन जातात आणि त्यानंतर आनंदी राहतात. अश्‍विनने ट्वीट केले की, जग फक्त तुम्हाला रडतांना पाहू इच्छिते. सांत्वन हा फक्त शब्द नाही आहे. आता ही लोकांमध्ये ही सहानुभूती आहे. देव स्टीव स्मिथ आणि बेनक्रॉफ्टला ताकद देवो. अश्‍विनने ट्वीट केले की, डेव्हिड वॉर्नलादेखील यातून बाहेर पडण्यासाठी ताकद देवो. आशा आहे की, त्यांचा संघ त्यांचे समर्थन करेल. स्टीव स्मिथने गुरुवारी सिडनीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान त्याला अश्रृ अनावर झाले. स्मिथ आफ्रिकेहून ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर 5 मिनिटे प्रेस कॉन्फरन्समध्ये रडत होता.

ऑस्ट्रेलियात आल्यानंतर डेव्हिडला मोठ्या प्रमाणात क्रिकेटप्रेमींच्या रोषाला सामोर जावे लागले. पत्रकार परिषदेत डेव्हिडलाही रडू कोसळले. येणार्‍या काळात मी नक्कीच आत्मपरिक्षण करून तुमचा विश्‍वास पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करेन, असे म्हणत त्याने पुन्हा एकदा चाहत्याची आणि देशातील जनतेची माफी मागितली. त्याचवेळी पुन्हा मी ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळू शकेल असे वाटत नाही, असेही तो शेवटी म्हणाला.

इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल) मधील फ्रँचायझी सनरायजर्स हैदराबादने आगामी आयपीएल हंगामासाठी डेविड वॉर्नरच्या जागी एका खेळाडूची निवड केली आहे. इंग्लंडचा सलामीवीर अ‍ॅलेक्स हेल्स आता डेविड वॉर्नरच्या जागी खेळणार आहे. हेल्सला त्याची बेस प्राईज 1 कोटी रुपयांना रजिस्टर्ड अँड अ‍ॅवेलेबल प्लेयर्स पूल (आरएपीपी) लिस्ट मधून खरेदी केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी या बाबत माहिती दिली. हैदराबादमध्ये आता वार्नरच्या जागी हेल्सची निवड करण्यात आली आहे. हेल्स 2015 च्या हंगामामध्ये मुंबई इंडियंसकडून खेळत होता. पण त्याला कोणताच सामना खेळण्याची संधी नाही मिळाली. आता वॉर्नरवर बॉल टॅपंरिंगच्या प्रकरणात बंदी घातल्याने त्याच्या जागी नवा खेळाडू हैदराबादने आपल्या संघात घेतला आहे.