वॉश आऊट ; अपर पोलिस अधीक्षक लोहित मतांनीचा धडाका ; साकळीनजीक जुगार अड्ड्यावर धाड

0

चौघांना अटक ; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त ; पाच संशयीत पसार

यावल- तालुक्यातील साकळी गावाच्या शेती शिवारात चालणार्‍या जुगार अड्ड्यावर अप्पर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या पथकाने छापा टाकत तब्बल दोन लाख 66 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला तर कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून पाच जण पसार झाले. ही कारवाई रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास साकळी गावापासून तब्बल पाच किलोमीटर लांब शेतात करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कठोर कारवाईची मोहीम सुरू आहे तर अवैध धंदे बंद असल्याने साकळीतील काहींनी गावापासून पाच किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या पंडित रामदास पाटील यांच्या शेताजवळ जुगार अड्डा सुरू केला होता व त्याची गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांना मिळाली होती तेव्हा रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांचे पथक या भागात दाखल झाले व साकळी शिवारातील पंडित रामदास पाटील यांच्या शेताजवळील आंब्याच्या झाडाखाली झन्ना-मन्ना जुगार खेळताना त्यांना नऊ जण आढळून आले. पोलिसांना पाहून त्यातील पाच जणांनी पळ काढला तर भीमराव पंडित पाटील, हेमचंद्र उर्फ राजू जोगी, मोहसीन शेख कबीर, उमर अली मोहम्मद कच्छी या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर किसन सीताराम महाजन, सैय्यद अकबर सय्यद रज्जाक, जुम्मा पठाण, दशरत इंगळे, अरुण बळीराम कोळी हे पाच जण फरार झाले तर या जुगार अड्ड्यावर 62 हजार 170 रुपयांच्या रोकडसह चार दुचाकी वाहन व चार मोबाईल असा एकूण दोन लाख 66 हजार 170 रुपयाचा मुद्देमाल या पथकाने हस्तगत केला. यावल पोलिसात विजय नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.