जळगाव । नावीन्य आणि विस्तारासह झालेल्या पन्नास वर्षांच्या दीर्घ आणि दर्जेदार प्रवासात वोक्हार्ट हॉस्पिटल्स समूहाने मिळविलेले प्रत्येक यश, नवा शोध, नवा उपक्रम, मिळालेली प्रशंसा आणि पुरस्कारांचा आनंद नुकताच आपल्या दीड हजार सहकार्यांसमवेत साजरा केला. एनसीएसआय डोममध्ये हा कार्यक्रम झाला. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भारतीय संस्थेच्या प्रवासाची आणि यशाची कथा मांडणारे ’ओडिसी ऑफ करेज’ हे आत्मचरित्र वोक्हार्टचे अध्यक्ष डॉ. हाबिल खोराकीवाला यांनी लिहीले आहे, त्याचे प्रकाशन यावेळी नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, गोदरेज समूहाचे अध्यक्ष आदी गोदरेज, आरपीजी एंटरप्रायजेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका, इंग्लंडमधील ईस्ट अँग्लिया विद्यापीठातील मेडिकल मायक्रोबायोलॉजी विषयाचे प्राध्यापक डेव्हीड लिव्हरमोर आणि बोस्टन, मॅसाच्युसेट्स येथील हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील मेडिसिन विषयाचे प्राध्यापक व पार्टनर्स हेल्थकेअर इंटरनॅशनलचे एमडी, अध्यक्ष आणि सीईओ असलेले गिल्बर्ट एच. मज हे मान्यवर उपस्थित होते.
नावीन्य आणि विस्तारासह दर्जेदार प्रवास
यावेळी वोक्हार्ट हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मुर्तजा खोराकीवाला, वोक्हार्ट फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विश्वस्त डॉ. हुझैफा खोराकीवाला आणि वोक्हार्ट हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालक झहाबिया खोराकीवाला यांनी आपल्या वोक्हार्टमधील जीवनाबद्दल अनुभव कथन केले. डॉ. हाबिल खोराकीवाला म्हणाले, पन्नास वर्षांपूर्वी आम्ही हे स्वप्न पाहिले होते. तेव्हापासून वेगळ्या वाटेवरून चालत राहून आपला ठसा उमटवत आम्ही जागतिक पातळीवर पोहचलो. त्याचवेळी आपल्या आतमध्ये डोकावत राहून प्रत्येक संधींचे सोने करत आम्ही आमच्या कार्याचे क्षितिज विस्तारले. एक उत्कृष्ट कार्यसंस्कृती निर्माण केली. मूल्ये जपतच नवीन मूल्ये रुजविली. अनेक अडथळे पार करत, संकटांवर मात करत, चुकांमधून शिकत अधिकाधिक मजबूत बनत प्रत्येक वेळी नवीन उंची गाठली. वोक्हार्ट हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती झहाबिया खोरकीवाला म्हणाल्या, माझे वडील डॉ. हाबिल खोराकीवाला आपला वैद्यकीय व्यवसाय बुद्धीने आणि हे हॉस्पिटल हृदयाने चालवतात. ते रुग्णसेवेला सर्वोच्च महत्व देतात आणि आम्हालाही नेहमी त्याच उद्देशाने काम करण्यास प्रोत्साहन देतात. म्हणूनच ’लाइफ विन्स’ या विचारांवर श्रद्धा ठेवून आम्ही काम करतो.