बंगळुरू । भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची शर्यत आता आणखी रंगतदार झाली आहे. भारतीय ज्युनिअर संघाच्या निवड समितीचे प्रमुख आणि माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनीही प्रशिक्षकपदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवल्यानंतर प्रसाद यांनी अर्ज दाखल केल्यामुळे रवी शास्त्री यांच्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे. दरम्यान, व्यंकटेश प्रसाद यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नसला, तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसाद यांनी अर्ज केला आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्रीयांच्यासह वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी, रिचर्ड पायबस, लालचंद राजपूत, दोडा गणेश यांनीही अर्ज दाखल केले आहेत.
रवी शास्त्रींना सचिनचे पाठबळ
रवी शास्त्री यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज करावा यासाठी सचिन तेंडुलकरने त्यांची मनधरणी केली असल्याचे बोलले जाते. शास्त्री आणि सचिन सध्या लंडनमध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहेत. लंडनमध्ये झालेल्या भेटीदरम्यान सचिनने शास्त्रींशी चर्चा करून त्यांना प्रशिक्षकपदाचा अर्ज भरण्यासाठी तयार केल्याचे बोलले जात आहे. विराट आणि रवी शास्त्री यांचे चांगले संबंध असून विराटची शास्त्री यांच्या नावाला पसंती असल्याचे सचिनचे मत आहे.
गांगुलीने कुंबळेला दिला होता पाठिंबा
क्रिकेट सल्लागार समितीने 2016 मध्ये प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळेची निवड केली तेव्हाही सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्षमण समितीत होते. त्यावेळी भारतीय संघाचे संचालक असणारे रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदासाठी निवड होणार, असे सगळ्यांना वाटत होते. पण अचानकपणे कुंबळे यांचे नाव पुढे आल्यावर सगळे चित्र पालटले. त्यावेळीही सचिन तेंडुलकरने रवी शास्त्री यांचे नाव पुढे केले होते. पण सौरव गांगुलीने अनिल कुंबळेला पसंती दिल्यामुळे शास्त्री यांची संधी हुकली.
प्रशासकीय समिती नाराज
प्रशिक्षपदाबाबतील घडामोडींवरून बीसीसीआयच्या प्रशासकीय कामकाज समितीमध्ये नाराजी पसरली आहे. सचिनच्या सांगण्यावरून शास्त्रींनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केल्याचे वृत्त आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अनिल कुंबळेनी प्रशिक्षकपद सोडल्यावर महाव्यवस्थापकांनी सेहवागला अर्ज करण्यास सांगितले होते.