व्यंकय्या की गांधी?

0

नवी दिल्ली : भारताच्या 15 व्या उपराष्ट्रपतिपदासाठी शनिवारी (दि.5) मतदान घेतले जाणार आहे. या पदासाठी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)तर्फे व्यंकय्या नायडू व संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)तर्फे महात्मा गांधी यांचे पणतू व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी हे निवडणूक रिंगणात आहेत. लोकसभा व राज्यसभेचे सदस्य या निवडणुकीत मतदान करतील. गोपनीय मतपत्रिकेद्वारे मतदान घेतले जाणार आहे. बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय जनता दल (संयुक्त) एनडीएत सहभागी झाल्याने व्यंकय्या नायडू यांचे मतदान वाढले आहे.

व्यंकय्या नायडू यांचे पारडे जड
उपराष्ट्रपतिपदासाठी लोकसभा व राज्यसभेचे खासदारच मतदान करत असतात. एनडीएचे व्यंकय्या नायडू यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. एकूण मतदान 790 असून, आता राज्यसभेत भाजपचे 58 सदस्य आहेत. तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे 57 सदस्य आहेत. सत्ताधारी एनडीएचे लोकसभेत एकूण 340 सदस्य तर राज्यसभेत 85 सदस्य आहेत. म्हणजेच, एनडीएकडे 425 मतदान आहे. त्यामुळे नायडू यांचे सद्या तरी पारडे जड आहे. गत निवडणुकीत यूपीएचे हमीद अन्सारी यांना 490 मते पडली होती. तर एनडीएचे जसवंत सिंह यांना 238 मते पडली होती. 2012 मध्ये झालेल्या या निवडणुकीत त्यावेळी यूपीएकडे बहुमत होते.