व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींवर पुन्हा राज ठाकरेंची टीका

0

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यंगचित्राच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा निशाना साधला आहे. ‘काँग्रेसने मला छळले, म्हणून मी तुम्हाला छळतोय’ असे मोदी भारतीय जनतेला म्हणत असल्याचे राज यांनी व्यंगचित्रातून दाखवले आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री असताना मला काँग्रेसने छळले होते, असे मोदींनी म्हटले होते. या विधानाचा दाखला देत राज यांनी व्यंगचित्र बनवले आहे. मोदींच्या चेह-यावर चिडलेले हावभाव दाखवले असून त्यांनी भारतीय जनतेला हातात पकडले आहे. आपण त्यांना का छळत आहोत याचे कारण सांगताना मोदी दिसत आहेत.

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली होती. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातील वर्षे वाया गेली आणि भ्रष्टाचार करता यावा म्हणून अनेकांना अशक्त सरकार हवे असते, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर टीका केली होती. गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेसने माझे पाय खेचण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर वाटेल ते आरोप करुन माझा छळ करण्यात आला असल्याचेही मोदी म्हणाले होते.