मुंबई-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास व्यंगचित्रातून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याचा समाचार घेतला आहे. अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर असून पक्षाच्या समर्थन वाढीसाठी लोकसंपर्क अभियानांतर्गत त्यांनी आज प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तोच धागा पकडून राज यांनी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून अमित शहा यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. अलीकडेच माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट सिनेमा प्रदर्शित झाला. त्याच चित्रपटाच्या नावाचा वापर करुन राज यांनी सुंदर व्यंगचित्र रेखाटले आहे.
अमित शहा त्यांच्या हातातील यादी पाहत असून त्यामध्ये माधुरी, लतादीदी, कपिलदेव, उद्धव, मिल्खासिंग ही नावे आहेत. त्याचवेळी शहांनी खरंतर ज्या भाजपा कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना प्रोत्साहित करणे अपेक्षित होते. तोच भाजपा कार्यकर्ता अमित शहा त्यांची बकेट लिस्ट तपासत असताना त्यांच्याकडे आशाळभूतपणे पाहत असल्याचे दाखवण्यात आले आहे. राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून नेमका निशाणा साधला आहे.