व्यक्तिगत चारित्र्याची चाड हवी!

0

राजकारणात चारित्र्यवान माणसे अभावानेच आढळू लागली आहेत आणि भ्रष्टाचारांचा सुळसुळाट झालाय. चारित्र्यवान नेत्यांची संख्या हळूहळू रोडावू लागली आहे. आता तर ती नष्ट होते की काय, अशी शंका येऊ लागलीय. त्यातच पुरोगामी आणि प्रतिगामी विचारसरणीची सरमिसळ झालीय. वैचारिक अधिष्ठान असलेली राजकीय नेते मंडळी एकाच पातळीवर आल्याने लोकांसमोर नेतृत्वाबद्धल साशंकता निर्माण झाली…

राजकीय नेत्यांच्या चारित्र्याचा प्रश्‍न नेहमीच दबक्या आवाजात चर्चिला जातो. दिल्लीतल्या राजकारण्यांपासून गल्लीतल्या पुढार्‍यापर्यंत सगळ्यांच्याच चारित्र्याची उठाठेव सुरू असते. सध्या काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांच्या भाजप प्रवेशाने राजकीय चारित्र्याची पुन्हा चर्चा सुरू झाली. त्यांनी आपल्या अनौरस पुत्राला नाकारणं, डीएनए टेस्टचं आव्हान, तिवारींची शरणागती, त्यानंतर पुत्राचा आणि पत्नीचा स्वीकार या सगळ्या घटना पुन्हा उजळल्या गेल्या. अशा चारित्र्यहीन माणसाची पार्टी विथ डिफरन्स असलेल्या भाजपला गरज का लागावी? सत्तेसाठी काहीही केले जात आहे कोणताही विधिनिषेध राहिलेला नाही.

देशात आणि राज्यात संमिश्र सरकारे आली आणि सत्तेसाठी म्हणून सर्वच पक्षांना आपली धेय्यधोरणं गुंडाळून ठेवावी लागली आहेत. सत्ताधारी पक्षाला सत्तासाथीदार असलेल्या इतर पक्षांना सांभाळीत, कसरत करीत कारभार करावा लागल्याने त्यांना कोणत्याच पक्षावर, त्याच्या ध्येयधोरणावर टीका करता येत नाही. त्यामुळे लोकांसमोर जाताना कशा पद्धतीनं जावं, ही एक समस्याच सार्‍या पक्षांसमोर होती. यावर तोडगा म्हणून आपली सत्ता आली तर हा आमचा सत्तासाईबाबा असं सांगून आपल्या नेत्यांच्या छब्या लोकांसमोर धरल्या जाऊ लागल्या. मग विरोधी पक्षाकडे त्या सत्तासाईबाबाच्या विरोधात चारित्र्यहनन करण्या व्यतिरिक्त कोणताच पर्याय उरला नाही. चारित्र्यावर चिखलफेक ही नित्याचीच बाब झाली. वास्तविक चारित्र्य आणि भ्रष्टाचार या दोन्ही बाबी व्यक्तीकडून सार्वजनिकतेकडे जात असतात. चारित्र्य ही काही पेहरावासारखी किंवा प्रसाधनासारखी बाहेरून स्वीकारण्याची अथवा वापरायची चीज नव्हे. चारित्र्य हे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असतो म्हणून तो त्याच्या जीवनाचाही भाग असतो. माणसाच्या नीती-अनिताच्या कल्पना या सार्‍यातून माणसाचं चारित्र्य आकार घेत असतं. केवळ स्त्री-पुरुष संबंधापुरती चारित्र्याची कल्पना अथवा व्याख्या सीमित असत नाही आणि असूही नये. त्या सार्‍याला पुन्हा समाजाने ठरवलेल्या निकषांची परिमाणं आहेत.

दोन व्यक्तींमधले विवाहबाह्य संबंध हा व्यक्तिगत चारित्र्यहीनतेचा भाग झाला. पण, त्यासाठी सत्तास्थानाचा अथवा अधिकाराचा गैरवापर करणे, हा सार्वजनिक चारित्र्यहीनतेला प्रवृत्त करतो. तिच गोष्ट सार्वजनिक पैशाची उधळपट्टी करण्याबाबत. जी वस्तू माझी नाही, मी ती वापरू नये. जी दुसर्‍याची आहे, ती त्याच्या परवानगीनेच वापरायची, एवढी साधी सभ्यता ज्यांच्यापाशी नसेल तर तो माणूस सर्वत्र आपला हक्कच प्रस्थापिक करू पाहतो आणि हळूहळू सार्वजनिक जीवनात सुद्धा!

चारित्र्यहीनतेकडे, भ्रष्टतेकडे वळू लागतो. या संदर्भात ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या वाटा तुझ्या माझ्या… या पुस्तकातील एक विचार आठवतो. ते म्हणतात, वैयक्तिक जीवनातील शील आणि चारित्र्य, ही एक फार मोठी जबाबदारी आहे. समाजवादी संघटनेचा कार्यकर्ता जर विद्यार्थी असेल तर तो इतरांपेक्षा अधिक नियमित असला पाहिजे. शालेय अभ्यासात अधिक चोख असला पाहिजे. त्याचे स्वतःचे जीवनमान आणि वैयक्तिक खर्च उधळपट्टी नसलेला तसाच जबाबदारीचा असला पाहिजे. असा कार्यकर्ता समाजावर एक नैतिक दडपण असतो. म्हणजेच चारित्र्यसंपन्न व्यक्तीचा इतरांवर प्रभाव पडतो अथवा सार्वजनिक चारित्र्य चोख असण्यासाठी व्यक्तिगत चारित्र्य स्वच्छ असणं आवश्यक आहे. आज समाजावर असं दडपण आणू शकणार्‍या व्यक्ती आपल्या भोवतालच्या समाजातून आपल्याला शोधाव्या लागतील. कारण शील आणि चारित्र्य याबाबतच्या जबाबदारीची उणीवच कमी अधिक होऊ लागली आहे.

मध्यंतरी राज्यात सार्वजनिक चारित्र्याबाबत आणि भ्रष्टाचार याबाबत आंदोलन झाली. अण्णा हजारे यांच्यासारखी चारित्र्यवान मंडळी या आंदोलनाच्या अग्रभागी होती. पण, ही आंदोलने काही दिवसांनी थंडावली. राजकारणात चारित्र्यवान माणसे अभावानेच आढळू लागली आहेत आणि भ्रष्टाचारांचा सुळसुळाट झालाय. चारित्र्यवान नेत्यांची संख्या हळूहळू रोडावी लागली आहे, आता तर ती नष्ट होते की काय अशी शंका येऊ लागलीय. त्यातच पुरोगामी आणि प्रतिगामी विचारसरणीची सरमिसळ झालीय, यात सर्व राजकीय पक्ष अडकले. विविध वैचारिक अधिष्ठान असलेली राजकीय नेते मंडळी एकाच पातळीवर आल्याने लोकांसमोर नेतृत्वाबद्धल साशंकता निर्माण झाली आणि या साशंकतेतून नेतृत्वावरचा विश्‍वास उडाला. धेय्यधोरणे, वैचारिक बैठक, तत्त्व, निष्ठा, आचार विचार हे सारं साफ बुडाले, उरली फक्त खुर्चीची लालसा, महत्त्वाकांक्षा, त्यासाठी वाट्टेल टी तडजोड, लांगुलचालन, खोट्याचं खरं आणि खर्‍याचं खोटं करण्याची प्रवृत्ती, सार्वजनिक जीवनातला हा व्यभिचार थांबायला हवा. असं झालं तर चारित्र्यहीनता आपोआपच जाईल. देशाच्या दृष्टीने ते एक आशादायक चित्र असेल, त्याच प्रतीक्षेत तुम्ही, आम्ही, आपण सारेच राहायला काय हरकत आहे? उत्तर प्रदेशातील निवडणुकांसाठी एन. डी. तिवारी सारख्या भ्रष्ट नेत्यांना भाजपेयींची गळा भेट सत्तेसाठी गळा घोटणारा ठरला तर आश्‍चर्य वाटायला नको.

– हरीश केंची
9422310609