व्यक्तिगत दोषामुळे उदयनराजेंचा पराभव; शिवसेनेचा टोला

0

मुंबई: काल राज्याच्या विधानसभेसह सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागला. यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष सातारा लोकसभा पोटनिवडणुकीकडे लागले होते. याठिकाणी उदयनराजे यांचा पराभव झाला. दरम्यान यावरून शिवसेनेने सामन्यातील अग्रलेखातून उदयनराजे यांना टोला लगावला आहे. शिवरायांचे वंशज म्हणून कॉलर उडवत फिरणाऱ्या उदयनराजे यांचे वर्तन नीतिमत्तेचे असायला हवे होते. सातारची गादी छत्रपती शिवरायांची म्हणून मानसन्मान आहे. त्यामुळे छत्रपतींचे नाव घेऊन कुणी अल्टी – पल्टी करत असेल तर चालणार नाही हे सातारकरांनी दाखवून दिले. उदयनराजे भोसले यांचा हा व्यक्तिगत पराभव आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

भाजपने घडा घ्यावा

“शिवसेना-भाजप यांनी ‘युती’ म्हणून लढूनही राष्ट्रवादी व काँग्रेसला इतके यश का मिळाले? पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात दहा सभा घेतल्या. अमित शहा यांनी ३७० कलमावर चाळीस सभा घेतल्या. उदयनराजे भोसले यांच्यासाठी मोदी यांनी साताऱ्यात खास सभा घेतली. उदयनराजे यांचे पक्षांतर दिल्लीत अमित शहा यांच्या बंगल्याच्या हिरवळीवर झाले व आता सातारचे छत्रपतीच भाजपसोबत असल्याने महाराष्ट्रात आपल्यालाच शिवरायांचा आशीर्वाद असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले; पण सातारच्या जनतेने उदयनराजे यांचा पराभव केला . यापासून काय तो धडा घेणे गरजेचे असल्याचं,” उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

टोप्या बदलणारे घरी

“सत्तेचा उतमात करून राजकारणात कोणालाही कायमचे संपवता येत नाही आणि ‘ हम करे सो कायदा’ चालत नाही. स्वबळावर भाजपला बहुमत मिळवता आले नाही. भाजपच्या अनेक बालेकिल्ल्यांत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मारलेल्या मुसंडीचे विश्लेषण करायला वेळ लागेल. पक्ष फोडून व पक्षांतरे घडवून मोठा विजय मिळवता येतो हा भ्रमाचा भोपळा राज्याच्या जनतेने फोडला. पक्षांतरे करून ‘ टोप्या ‘ बदलणाऱ्यांना जनतेने घरी पाठवले आहे,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी एक लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. पाच महिन्यांपूर्वीच निवडून आलेल्या उदयनराजे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केल्याने ही पोटनिवडणूक चर्चेत होती. उदयनराजे यांचा पराभव भाजपासाठी धक्का देणारा तर राष्ट्रवादीसाठी दिलासा देणारा आहे.