नागोठणे । तांत्रिक शिक्षण घेताना त्यातील बारकावे लक्षात ठेवणे हे त्या विद्यार्थ्यांचे कर्तव्यच असते व पुढील जीवनात त्याचा त्याला मोलाचा फायदा होत असतो. व्यक्तिगत विकास हासुद्धा त्याचा एक अविभाज्य घटक असून, त्यातूनच या तरुणांमधील उद्योगनिर्मितीला चालना मिळत असते, असे अंधेरी, मुंबईतील उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ मोहिते यांनी सांगितले.
जिल्हा उद्योजकता विकास केंद्र, अलिबाग आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येथील तोरणा इंग्लिश मीडियम शाळेत विभागातील चाळीस तरुणांसाठी इलेक्ट्रिशियन वर आधारित उद्योजकता, या अभ्यासक्रमावर 45 दिवसांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी समारोपाचे समारंभात मोहिते यांचे व्यक्तिमत्त्व विकास आणि उद्योजकता या विषयावर व्याख्यान ठेवण्यात आले होते.
या कार्यक्रमाला तोरणा शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश मोरे, एस.बी. जोशी, शैलेश ढाणे, जिल्हा उद्योजकता विकास केंद्राचे प्रदीप सावंत, दीक्षा थवई, महाजन आदी उपस्थित होते. तोरणा शाळा व कोकणरत्न पर्यटन विकास संस्थेच्या माध्यमातून मराठी तरुणांनी उद्योग व व्यवसायात पुढे येण्यासाठी विविध योजना राबवत असतो. जनतेने मला जर सरपंच बनवले, तर महिला बचत गट व तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी निश्चितच प्रयत्न करणार, असा विश्वास प्रकाश मोरे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.बी. जोशी यांनी केले.