व्यक्तिपूजा, राजकीय वारसा आणि बरेच काही…!

0

 

नाशिकच्या मागच्या विधानसभा आणि लोकसभेत निवडून आलेले आजी माजी आमदार, खासदारांवर सध्या जेलमध्ये राहण्याची वेळ आली असली, तरी जेव्हा निवडणूक प्रचाराचा कालावधी होता, तेव्हा आपल्या सायबाचं स्वप्नं आहे, एक डाव तरी लेकाला आमदार झालेला बघायचं आहे, तेव्हा यंदा मागं हटायचं नाही, अशी भावनिक साद घालत प्रचाराचे नारळ फुटले होते. त्यावेळी कारभार काय सायब अन् भाऊच बघणार हायेत.. कशाला काळजी करायची? अशी मखलाशीही करण्यात आली होती… तेव्हा कुणीही राजकीय वारसा घरातच फिरतो आहे किंवा बाप झाला, पुतण्या झाला आता पोरगा पण का? असा गळा काढलेला नव्हता. यंदा मात्र लोकशाही आणि स्थानिक स्वराज्य संस्था अधिक तरुण झाल्याने आणि राजकीय नेते मंडळींचेही वय झाल्याने साहजिकच अनेक नव्या जुन्या सर्व पक्षीय नेत्यांनी आपल्या मुलामुलींची तरुण तडफदार दमदार पिढी यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात उतरवली आहे. त्यात सध्या अधिक चर्चेत राहिलेत ते सांगली कोल्हापूरच्या सुपीक पट्ट्यातले सधन शेतकरी नेते सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी. सदाभाऊंनी आपल्या लेकाला सागरला एकदाचे आपला राजकीय वारसदार म्हणून मैदानात उतरवले… त्यांच्या म्हणण्यानुसार आपण हा निर्णय राजू शेट्टींना विचारूनच घेतला आहे, एकट्याने नाही. मात्र, राजू शेट्टी म्हणतात… यातलं आपल्याला काहीच माहीत नाही.

सध्या तरी सांगलीपासून मुंबईपर्यंतच्या राजकीय कट्ट्यांवर हा वाद चांगलाच रंगतो आहे. मुळातच राजू शेट्टींच्या अनेक निर्णयावर सांगली कोल्हापुरातल्या अनेक गावांतल्या हाडाच्या शेतकर्‍यांना आक्षेप आहे. याचे अधिक चांगले विश्‍लेषण जयसिंगपुरातले कर्नल काका पाटील करू शकतील. कवठे एकंदच्या सभेत आपल्यासमोरची 15-20 माणसांची गर्दी बघून उगाच का शेट्टी सायेब चिडले होते… थोडक्यात काय तर जो कधीच कामगार नसतो, तोच कामगार नेता बनतो आणि युनियन लीडर म्हणून मांडवली करतो, ही मांडवली कशाप्रकारची असते, हे चळवळीतल्या कार्यकर्त्यांपेक्षा अधिक चांगले कोण जाणू शकते. राजू शेट्टींचेही तसेच आहे. अजून तरी काही अंशी सदाभाऊंनी आपले नाते मातीशी अन् नाळ गावांशी जोडलेली आहे. त्यांनी जेव्हा आपल्या लेकाला सागरला थोड्या उशिराने का होईना आपला राजकीय वारसदार ठरवला तेव्हा या मातीतल्या नात्यांसोबत चर्चा करण्यापेक्षा त्यांनी थेट शेट्टींशी चर्चा करावी, अन आधी होकार दिल्यावरही नंतर केवळ आपल्या मूळ स्वभावावर जात शेट्टींनी यातलं आपल्याला काय माहीत नाही बुवा, असे म्हणावे याला कदाचित शेट्टी मुरब्बी राजकारण म्हणत असतील पण गावाकडं याला नेम धरून पायात पाय घालणं अन् उताण पाडणं असं मानलं जाते, असो. खरे तर आता सदाभाऊंनींही सत्तेत राहण्याकरिता काय काय तडजोडी केल्या हे एकदा स्पष्टच करावं.. काय आहे ना..आत्तापर्यंत जाणता राजा, शेतकर्‍यांचा कैवारी म्हणून आम्ही सायबाला वेळ साधू दिली… त्याच्या वेळेनुसार वागलो… पण आता घड्याळाचे काटे उलटे फिरलेत.. सायबाच्या हातात काहीच राहिलं नाही, याचे कारण काय तर आजवर शेतकर्‍याची तडफड, खतापाण्यासाठी त्याला रोज करावी लागणारी धावपळ, उधार उसनवारी.. कर्ज, सावकारी… मानहानी, आयाबहिणीच्या अब्रूवरचे घाले.. वर्षानुवर्षे सहन करीत राहिलेला शेतकरी खर्‍या अर्थाने कोणालाच कळला नाही, त्याच्या समस्या कोणालाच आपल्याशा वाटल्या नाहीत, वा त्या आपल्या समजून ठोस कृती कार्यक्रम राबवला तर राजकारण काय करायचे? हा प्रश्‍न पडल्यानेच प्रत्यकाने फक्त थट्टा मांडली, इतकी की एसीमध्ये बसणार्‍या माध्यम प्रतिनिधींनाही हा सेलेबल आयटम वाटला… त्यातच महाराष्ट्रातल्या तमाम शेतकर्‍यांनी स्वत:ला जातीच्या अस्त्राखाली दडवून ठेवले.. त्या माध्यमातून होणारे सामाजिक आणि कौटुंबिक शोषण अजूनच भयावह आहे… बाप भीक मागू देत नाही अन् आई जेवायला देत नाही, अशी अवस्था जगणार्‍या ग्रामीण भागातल्या नव शेतकर्‍यांचे, शिक्षित शेतकरी तरुणांचे भवितव्य आज तरी अंधारातच आहे… उज्ज्वल उष:कालाकरिता आज राज्यातल्या कोणत्याच नेत्याकडे ठोस आणि भरीव असे काहीच नाही… वर्षानुवर्षे शेतकर्‍यांचे प्रश्‍न, त्याची तडफड तशीच आहे, कर्ज पॅकेज त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही… मग ही व्यक्तिपूजा, व्यक्तिनिष्ठा, ही मानसिकता आपण कधी बदलणार?

उद्या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. जिल्हा परिषद हा ग्रामीण भागाचा महत्वाचा घटक आहे. यंदाच्या निवडणुकीत बहुतांश तरूण उमेदवार निवडणुकीत उभे आहेत. मा1 किती पक्षांनी आपल्या मतदारसंघातून युवकांकरिता आश्‍वासक प्रकल्पांची घोषणा करीत ग्रामीण युवक स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केलेला दिसला. प्रचारात यातल्या किती गोष्टी दिसल्या? किती स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या जिल्ह्यातील युवकांकरिता रोजगार, स्वयंरोजगारातून युवकांना स्वावलंबी करण्याचा स्वत:हून, लोकसहभागातून प्रयत्न केला आहे. मतदान करताना, आपला नेता निवडताना, त्याच्याकडे असणार्‍या गाडी घोड्यापेक्षा, तो आपल्याला विकासाच्या वाटेवर किती पुढे नेऊ शकतो, याचा विचार आता तरुणांनी साकल्याने केलाच पाहिजे अन्यथा पाटणा, बिहारच्या मार्गाने आपण चेन्नई एक्स्प्रेस पकडून तामीळच्या फिल्मी राजकारणाच्या मार्गावर… एका उद्ध्वस्ततेकडे पोहोचण्यास फारसा वेळ लागणार नाही.