बोदवड । सकारात्मक दृष्टीकोन हा व्यक्तिमत्व विकासात महत्वाची भूमिका बजावतो. परस्पर संवाद सकारात्मक पध्दतीचे असले तर त्याचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर पडत असतो, असे प्रतिपादन दातोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास प्रादेशिक संचलनालय नाशिकच्या पदशिक्षणाधिकारी सारीका डफरे यांनी केले. उमवि विद्यार्थी कल्याण विभाग व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड यांच्यातर्फे युवतीसभा आयोजित व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेत बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए.पी.राजपूत होते.
मानवी संवादाचा व्यक्तीमत्वावर प्रभाव
यावेळी सारीका डफरे यांनी विद्यार्थीनींना जीवनात ध्येय निश्चित करणे व त्यानुसार प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे सांगितले. आपला जगण्याचा दृष्टीकोन, वृत्ती, वर्तन आणि संवाद यांचे प्रतिबिंब व्यक्तिमत्वावर पडत असते. समाजात दुसर्यांशी असे वागा की जे दुसरे तुमच्यासोबत वागलेले आवडतील, असे आवाहन केले.
आरोग्य जोपासण्यासाठी आहाराचे नियोजन करा
याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलतांना प्राचार्य राजपूत यांनी व्यक्तिमत्व विकासात मार्गदर्शक बाबी विषद करतांना या कार्यशाळेत होणार्या मार्गदर्शनाचा अवलंब करण्याचा प्रयत्न युवतींना करावा, असे सांगितले. महिलांचे आरोग्य व आहार या विषयावर जळगाव येथील डॉ. प्राजक्ता महाले यांनी आरोग्य जोपासना योग्य आहाराचे नियोजनाने कसे करावे हे सांगितले.
कायद्यांवर केले मार्गदर्शन
दुपार सत्रात अॅड. जया झोरे यांनी स्त्रियांचे कायदेशीर अधिकार याबाबत माहिती देत स्त्रियांसाठीचे कायदे व अंमलबजावणी कशी होते, याचे विवेचन केले. डॉ.प्रा. सोपान बोराटे यांनी महिलांच्या व तरुणींच्या जीवनात येणारे मानसिक ताणतणाव व त्यामुळे बिघडणारे मानसिक आरोग्य यावर माहिती दिली. कार्यशाळेचे प्रास्ताविक युवती सभाप्रमुख प्रा.डॉ. गीता पाटील यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.डॉ. रुपाली तायडे यांनी केले. यावेळी प्रा.डॉ. ए.एन.चंद्रस, प्रा.डॉ.के.बी. तिवारी, प्रा.एच.एम. कोटेचा, प्रा.रत्ना जबरास, प्रा.कल्याणी जोशी, प्रा.शीतल देशमुख, प्रा.कोमल अग्रवाल, प्रा.कल्पना राऊत आदी उपस्थित होते. कार्यशाळेसाठी उपस्थित मान्यवर, विद्यार्थीनी व सहाय्य करणारे शिक्षकेतर कर्मचार्यांचे आभार प्रा.कंचन दमाडे यांनी मानले.