बंगळुरू येथील लंकेश पत्रिका या कन्नड साप्ताहिकाच्या संपादिका गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर रोजी अज्ञात मारेकर्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्यामुळे देशभरात खळबळ माजली आहे. गौरी लंकेश या उजव्या विचारसरणीच्या कट्टर विरोधक होत्या. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर देशभरातून विविध उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. कर्नाटकात ज्येष्ठ विचारवंत कलबुर्गी यांच्या हत्येनंतर ही दुसरी हत्या झाल्यामुळे देशात धार्मिक शक्ती फोफावत असल्याचा समज नागरिकांत दृढ होत आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर ट्विटरवर एक आक्षेपार्ह पोस्ट केली गेली होती. गुजरात येथील सुरतच्या निखिल दधिच या ट्विटर युझरने 5 सप्टेंबर रोजी अशी पोस्ट केली होती की, एक कुत्तिया कुत्ते की मौत क्या मरी, सारे पिल्ले एक सुर में बिलबिला रहे है. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या कार्यकर्त्यांना ट्विटरवर फॉलो करतात, त्यातील एका कार्यकर्त्याने हे आक्षेपार्ह ट्वीट केल्यामुळे नेटिझन्स संतप्त झाले आहेत. नंतर त्या ट्विटर युझरने, मी गौरी लंकेश यांना उद्देशून ही पोस्ट केली नव्हती, अशी सारवासारव केली. ही पोस्ट आता हटवण्यात आली असली, तरी मोदीभक्तांनी किती आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत, हे सर्वसामान्य माणसाला समजायला वेळ लागत नाही. वरून अनेक जण आम्ही लोकशाहीप्रमाणे राहत आहोत, असा देखावा करत असले, तरी त्यांच्या मन, मेंदूतील ठोकशाही व रानटी मनुवादी विचार जाणार नाहीत, हीच बाब खरी आहे. गौरी लंकेश यांच्या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. परंतु, देशात डाव्या विचारसरणीचे लोक शिल्लक ठेवायचे नाहीत, अशा प्रकारचा छुपा संघटित दहशतवाद फोफावत आहे, हे नक्की! अंधश्रद्धेला विरोध करणारे नरेंद्र दाभोळकर, डावे विचारवंत गोविंदराव पानसरे, धारवाडचे विचारवंत कलबुर्गी यांची हत्या धर्मवाद्यांनी केल्यानंतर ते आता उरलेल्या विचारवंतांना संपवायला निघालेत.
परंतु, हे धर्मवाद्यांनो, मनुवादात आपले विचार व शक्ती गहाण ठेवणार्या गुलामांनो, व्यक्तीला मारून विचार मरत नाहीत तर ते विचार अधिक प्रज्वलित होतील आणि जगाला सत्याची शिकवण देतील, हे लक्षात ठेवा.गौरी लंकेश या परखड, डाव्या विचारवंत होत्या. अनेक वृत्तवाहिन्यांवर त्यांना चर्चेसाठी बोलावत असत. अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध होत असे. लंकेश या उदारमतवादी दृष्टिकोनाच्या होत्या. त्यांनी विशेषतः कट्टर हिंदुत्ववादी प्रवृत्तींविरोधात सातत्याने आवाज उठवला होता. बंगळुरू येथील गौरी लंकेश या देशातील आघाडीच्या पत्रकार होत्या. या देशात भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीविरोधात मत व्यक्त केले तर तुमच्यावर दबाव आणला जाईल, हल्ला केला जाईल, मारहाण करण्यात येईल, प्रसंगी तुमची हत्या करण्यात येईल, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. धार्मिक झुंडशाहीच्या बळावर तुम्ही काही व्यक्ती संपवू शकता; परंतु चळवळ संपवू शकत नाही. ही एक प्रकारची झुंडशाही सोशल मीडियावर भाजपप्रणीत केंद्र सरकारच्या कार्यकाळात तयार झाली आहे. ही परिस्थिती सामाजिक सलोखा राखण्यासाठी व सर्वधर्मसमभाव राखण्यासाठी धोकादायक आहे. चार वर्षांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या मारेकर्यांनी पुण्यात केली होती. दोन आठवड्यांपूर्वी न्यायालयाने याप्रकरणी सुनावले होते की, समाजसेवकांच्या या हत्या म्हणजे एक संघटित झुंडशाही आहे. याला मोठ्या प्रमाणात संघटित पाठबळ असल्याशिवाय मारेकरी मोकाट राहणार नाहीत. केंद्र सरकार व देशातील गुन्हे तपास यंत्रणेने हे संघटित गुन्हेगार शोधावेत, अन्यथा देशात धार्मिक झुंडशाही पोसल्याची कबुली द्यावी.
-अशोक सुतार
8600316798