हिंजवडी। हॉटेल व्यवसायातून मतभेद झाल्याने भागीदाराने हॉटेलमध्ये घुसून तोडफोड करत कॅश काऊंटरमधील 65 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. तसेच एका मोटारीची काचही फोडली. ही घटना मंगळवारी (दि. 21) मध्यरात्री तीनच्या सुमारास हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी बोनी सुरकर, अनुज सुरकर यांच्यासह त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ललितकुमार साळुंखे (वय 31, वीर भद्रनगर, बाणेर) याने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मध्यरात्रीनंतर हॉटेलमध्ये धुमाकूळ
ललितकुमार आणि बोनी या दोघांनी हिंजवडीतील ‘बॉटम्स अप’ हे हॉटेल भागीदारीत चालविण्यासाठी घेतले होते. त्यांच्यामध्ये व्यवसायातून मतभेद झाले. त्यानंतर बोनी हा हॉटेलच्या भागीदारीतून बाहेर पडला होता. मंगळवारी मध्यरात्री अडीच-तीनच्या सुमारास बोनी, अनुज आणि त्यांचा साथीदार ललितकुमार यांच्या हॉटेलवर आले. हॉटेलमधील कामगारांना दमदाटी केली. साहित्याची तोडफोड करत सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. तसेच, कॅश काऊंटरमधील 65 हजारांची रोकड चोरून नेली.
मोटारीवर दगडफेक
हॉटेलमध्ये तोडफोड झाल्याचे समजताच ललितकुमार हॉटेलमध्ये आले. त्यांनी मोटार बाहेर पार्क केली होती. त्यानंतर आरोपी पाठीमागून पुन्हा हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी ललितकुमार यांच्या (एमएच 31, एझेड 3333) क्रमांकाच्या मोटारीवर दगडफेक करून पाठीमागील काच फोडल्याचे, पोलिसांनी सांगितले. हिंजवडी ठाण्याचे फौजदार पवन पाटील तपास करत आहेत.