फैजपूर : तामिळनाडू, दिल्ली सारख्या इतर राज्यांनी सलून व्यावसायीकांच्या अडचणी समजून घेऊन ज्या प्रमाणे नियमावली घालून व्यवसाय करण्याची परवानगी दिली त्याप्रमाणे परवानगी मिळावी किंवा दरमहा 10 हजार रुपयांप्रमाणे मासिक अशी आर्थिक मिळावी, अशी मागणी फैजपूरातील नाभिक समाजबांधवांनी फैजपूर प्रांताधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सलून व्यावसायीकांचा प्रश्न तातडीने न सोडवल्यास 08 जून 2020 पासून लोकशाहीच्या मानवी मुल्यांच्या अधिकारानुसार आम्ही कुठल्याही आंदोलनाची भूमिका घेवू, या आंदोलनामुळे काही परीणाम उद्भवल्यास सर्व त्यास शासन जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला आहे.
व्यवसाय बंद झाल्याने कुटुंबावर संकट
23 मार्च 2020 पासून लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या नाभिकांचा सलून व्यवसाय ठप्प असल्याने समस्त राज्यातील सलून व्यवसायीकांची उपासमार होत आहे. अशा परीस्थितीत सुद्धा शासनाने दिलेल्या आदेशानुसार नाभिकांनी आपला सलून व्यवसाय अगदी तंतोतंत बंद ठेवला आहे. या संदर्भात 17 एप्रिल 2020 रोजी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे संरक्षण कीट व शासकीय मदतीची मागणी असलेले निवेदन देण्यात आले परंतु अद्यापपावेतो या संदर्भात प्रशासनाकडून कुठलेही ठोस पाउल उचलले गेले नाही तर 5 जून 2020 रोजी पुन्हा सलून व्यावसायीकांना मदत व संरक्षण मिळावे याबाबत नाभिक समाजाच्या वतीने सोशल डीस्टन्सींगचा वापर करत पुन:श्च स्मरणपत्र ( निवेदन ) उपविभागीय अधिकारी तथा प्रांतधिकारी फैजपूर यांना देण्यात आले आहे. यावेळी फैजपूर नाभिक समाजाचे अध्यक्ष बंटी आंबेकर, जिल्हा संघटक किशोर श्रीखंडे, तालुका प्रतिनिधी प्रवीण हातकर, प्रमोद जगताप, छोटू सनंसे व पीसरातील नाभिक सलून व्यावसायीक उपस्थित होते.