व्यवस्थापनाने बँकेशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वैमानिकांचा संप मागे !

0

मुंबई: आर्थिक संकटात सापडल्याने जानेवारीपासून वेतन न मिळाल्याने जेट एअरवेज कंपनीच्या नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड या देशांतर्गत वैमानिकांनी आजपासून संपाचा निर्णय घेतला होता. मात्र व्यवस्थापनाने स्टेट बँकेशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याने अखेर संपाचा निर्णय मागे घेण्यात आला. वेतन थकल्याने आजपासून ११०० वैमानिकांनी संपाचा निर्णय घेतला होता. मात्र चर्चेचे आश्वासन दिल्याने रात्री उशिरा हा निर्णय मागे घेण्यात आला.

https://janshakti.online/new/%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8/

संघटनेने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडे घातले आहे. विमान कंपनी वाचवण्यासाठी १५०० कोटी रुपयांची निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती बँकेकडे केली आहे. तर कंपनीतील २० हजार नोकऱ्या वाचवा, असे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे.

विमानांची दुरुस्ती आणि तपासणी करणाऱ्या फ्लाइट इंजिनीअरांनीही वैमानिकांना पाठिंबा देत सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला होता. आर्थिक संकटामुळे जेट एअरवेजमधील कर्मचाऱ्यांना वर्षभरापासून अनियमित वेतन दिले जात आहे. वैमानिक व फ्लाइट इंजिनीअरांना दर तीन महिन्यांनी एका महिन्याचे तर अन्य कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांतून एकदा वेतन दिले जात होते. पण, आता वैमानिक आणि फ्लाइट इंजिनीअरांना जानेवारीपासून वेतन मिळालेलेच नाही. यामुळे त्यांना कुटुंबाचा दैनंदिन खर्च चालवणे कठीण झाले आहे. याच्या निषेधार्थ वैमानिकांनी १ एप्रिलपासूनच संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. पण, व्यवस्थापनला निर्णय घेण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला होता. त्यानुसार आता वैमानिक सोमवारपासून उड्डाण बंद करणार होते.