व्यवस्थापन परिषद सदस्यांची निवड जाहीर

0

जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर अधिसभेतून प्राचार्य एल.पी.देशमुख आणि प्रा.नितीन बारी हे 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत निवडून आले. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी अधिसभेची पहिली बैठक झाली. या बैठकीत प्राचार्यांमधून व्यवस्थापन परिषदेवर खुल्या प्रवर्गातून निवडून देण्याच्या एका जागेसाठी आणि अध्यापकांमधून खुल्या प्रवर्गात निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी निवडणूक झाली. प्राचार्यांमधून एल.पी.देशमुख (नुतन मराठा महाविद्यालय, जळगाव) आणि प्राचार्य आर.एस.पाटील (पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शहादा) हे दोन उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते.

चार मते बाद
बैठकीत 56 अधिसभा सदस्यांनी मतदान केले. त्यामध्ये चार मते बाद झाली. 52 मते वैध ठरली. त्यापैकी निवडून येण्यासाठी 27 मतांचा कोटा निर्धारित करण्यात आला. प्राचार्य एल.पी.देशमुख यांना प्रथम पसंतीची 41 मते प्राप्त झाली. तर प्राचार्य आर.एस.पाटील यांना 11 मते प्राप्त झाली. अध्यापकांसाठी झालेल्या 56 मतदानापैकी एक मत बाद झाले. 55 पैकी विजयासाठी 28 मतांचा कोटा निश्‍चित करण्यात आला. प्रा.नितीन बारी यांना पहिल्या पसंतीची 38 मते तर प्रा.संजय सोनवणे यांना 17 मते प्राप्त झाली.