व्यवहारात नोटा कमीच असणार!

0

नवी दिल्ली : केंद्र सरकारने चलनातून बाद केलेल्या 500 व 1000 रुपयांच्या चलनाचे मूल्य हे 15.44 लाख कोटी एवढे होते. एवढ्याच मूल्याच्या नवीन नोटा चलनात आणल्या जाणार नाही. सरकार चलनात तूट ठेवणार असल्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलेत. चलनातील ही तूट डिजिटल करन्सीच्या माध्यमातून भरून काढली जाईल. नोटाबंदी हा सरकारचा ऐतिहासिक निर्णय असून, सध्या त्रास होत असला तरी त्याचे दीर्घकालीन चांगले फायदे आहेत. देशातील परिस्थिती ही लवकरच निवळेल, असा विश्‍वासही जेटली यांनी व्यक्त केला. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या (फिक्की) 89 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जेटली बोलत होते. अर्थव्यवस्था वा चलनात अधिक रोख ठेवल्यास करचोरी, काळा पैसा व अपराधांमध्ये वाढ होते. ते टाळण्यासाठी सरकार चलनात रोख कमीच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जादा रोख चलन अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक
उद्योगपतींना संबोधित करताना अरुण जेटली म्हणाले, की 8 नोव्हेंबररोजी नोटाबंदीची घोषणा केली तेव्हा 500 रुपयांचे 1,716.50 कोटी आणि हजार रुपयांच्या 685.80 कोटी नोटा चलनात होत्या. त्यांच्याऐवजी नवीन चलन अर्थव्यवस्थेत आणण्याची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. रिझर्व्ह बँकेमार्फत नवीन चलन युद्धपातळीवर बँका व टपाल कार्यालयांना उपलब्ध करून दिले जात आहे. गेल्या पाच आठवड्यांत हे काम अत्यंत वेगाने सुरू असून, लवकरच ते पूर्ण होईल. गेल्या 70 वर्षात देशाचे चलन बदलले नाही. त्यामुळे जे काही सुरू होते ते धोकादायक होते. रोख अर्थव्यवस्थेचे काही दुष्परिणाम होते. ते आता दिसणार नाहीत. सद्या 75 कोटी डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे आणि ई-वॅलेटद्वारे मोठ्या प्रमाणात व्यवहार होत आहे. नवीन चलन कमी मर्यादेत छापणार असून, डिजिटल करन्सीला प्रोत्साहन देणार आहोत, असेही जेटली यांनी स्पष्ट केले.