जळगाव । व्यसन ही एक सामाजिक समस्या असून या समस्येचे निवारण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून स्वयंस्फुर्तीने प्रयत्न करुन व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी वचनबध्द होऊ या, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी केले. जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व जिल्हा सामान्य रुग्णालय यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील विविध शासकीय विभागातील अधिकार्यांसाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व कोटपा (सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम) 2003 या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एन.एस. चव्हाण, सहा. धर्मदाय उपायुक्त गजानन जोशी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहा. आयुक्त एम.डी. शहा, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण उपस्थित होते. सुत्रसंचालन दादाजी सोनवणे यांनी केले तर आभार डॉ. जयकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी मुकेश पाटील, रुचिका साळुंखे, राहूल वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
अधिकार, जबाबदारीवर मार्गदर्शन
कार्यशाळेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा सल्लागार डॉ. नितीन भारती, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. संपदा गोस्वामी यांनी सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा (कोटपा) 2003 कायद्यातील विविध कलमांच्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता विविध विभागातील अधिकार्यांना त्यांचे अधिकार व जबाबदारीबाबत सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. तसेच या कायद्याची अंमलबजावणी तालुका व गाव पातळीवर प्रभावीपणे होण्याकरीता करावयाच्या उपाययोजनांची माहितीही यावेळी उपस्थितांना दिली.