व्यसनविरोधी कायदा सक्तीचा व्हावा

0

आपण गेली 65 हून अधिक वर्षे लोकशाहीत वावरतो. लोकशाहीची जपणूक करताना अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य आपण मनःपूर्वक जपतो. कोणत्याही गोष्टींची सक्ती नसावी असाच आपला आग्रह असतो. तरीही आज जाणीवपूर्वक सक्तीचा व्यसनविरोधी कायदा व्हावा अशी विच्छा मनात आलीय. याबद्दल मतभेद होऊ शकतात. समाज व्यसनमुक्त व्हायचा असेल तर कायदा नव्हे तर प्रबोधन गरजेचे अथवा कायदा करून व्यसने सुटतील का, असे प्रश्‍न समोर येऊ शकतात याची मला कल्पना आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे…ज्याचे त्याने ठरवायचे जगायचं कसं… लोकांना काही कळत नाहीय का…. तुम्हीच तेवढे कोण शहाणे लागून गेलात… पैसा आमचा आम्ही कसा पण वापरू… व्यसन संपले तर समाज सर्वांगीण सुधारेल हे कशावरून…. असे एक ना अनेक प्रतिक्रिया मला अपेक्षित आहेत व काही मतभेदाने मान्यही आहेत.
तरीही…..व्यसन… हा एक रोग आहे. रोगाचे लक्षण नव्हे. व्यसन हे कधीच व्यक्तीपुरती मर्यादित परिणाम करत नाहीय. दारू पुरुषाच्या अंगात असली तरी तिचा मुख्य परिणाम थेटपणे घरच्या स्त्रीवर व काही प्रमाणात लहान मुलांवरही होतो. सिगारेट जरी एक मनुष्य ओढत असला, तरी धूर मात्र शेजारी पसरत असतो. जुगार एकटा खेळत असला, तरी पैसा इतरांचाही असतो. गुटखा एकटे खात असला, तरी वास बोलताना समोरच्याला जाणवतो. मटका एकटा खेळला, तरी त्याचे टेन्शन कडेच्याना असतं हे पाहिलय मी. पुन्हा दारू पिऊन गोंधळ …
गुटखा खाऊन तणतणणं… मटका खेळून सतत तणावात.. जुगार खेळून कर्जबाजारी हे प्रकार नित्याचेच. हे सर्व रोखण केवळ संवाद अथवा प्रबोधनाने शक्य नसते. त्याला कायदा जोडावाच लागेल व कायद्याची रीतसर अंमलबजावणी करावीच लागेल. कायमची दारूबंदी… चोरून खाल्ला जाणारा गुटखा पकडणे… मावा करणारे हात धरणे… जुगारअड्डे उद्ध्वस्त करणे…. मटका छापा घालणे व महत्त्वाचे म्हणजे वृत्तपत्रांनी मटका छापू नये अशी प्रेमळ विनंती आदेश देणे असे निरनिराळ्या मार्गांनी व्यसन रोखायला हवे. कुणी म्हणेल यातून मिळणार्‍या महसुलाचे काय ?? त्याला ठणकावून सांगा… मानवी जीवनाची सुरक्षितता हा सर्वात मोठा महसूल असतो.

या व्यसनमुक्तीसाठी राजकीय व शासकीय पातळीवर जबरदस्त इच्छाशक्ती असायला हवी, तरच हे शक्य आहे. ही सारी व्यसने पुरवणारी लोकांच्या चरितार्थाचे काय?? याचा विचार करायची जरुरी नाहीय. उद्या प्रत्येक दरोडेखोर अथवा चोर आपल्या चरितार्थाविषयी मागणी करू लागेल. मूठभरांच्या पोटासाठी मोठ्या जनसमूहाची क्रयशक्ती गमावणे हे इष्ट नसते.
आपल्याकडे यापूर्वी मोफत व सक्तीचा शिक्षण कायदा शाहूराजाने केला होता. एकूणच समाजाच्या भल्यासाठी कधीकधी सक्ती करावी लागली, तर तिथे उगाचच अभिव्यक्तीचे प्रश्‍न उपस्थित होऊ नयेत. भारतीय समाजमन असेच हळूहळू सुधारेल. त्याला अशी सवय लावावे लागेल अन् ही सक्ती त्या व्यसनी माणसासाठी.. त्याच्या कुटुंबासाठी… एकूणच समाजाच्या भल्यासाठी असेल तर माझं प्रामाणिक मत असं की ही सक्ती व्हावीच.
नुकतेच न्यायालयानेही हायवेवरील दारूदुकाने बंद करावीत, आणि येत्या 1 एप्रिलनंतर या दुकानांचे परवाने पुन्हा देण्यात येवू नयेत, असा दंडक केला आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून आपला कार्यभाग साधायचे, हे आता मद्यविक्रेत्यांना आणि मद्यसेवन करणार्‍यांनाही चांगलेच अवगत झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचा विचार प्रामुख्याने करावा, हेच खरे.

शेवटी व्यसनाधिनता कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरूवात असू शकत नाही, हे प्रत्येक व्यसन करणार्‍याने लक्षात घ्यावे, इतकेच.
व्यसनमुक्त समाज हा विवेकाच्या पहिल्या टप्प्यावर येतो. तिथून तो जीवन वृद्धिगंत करणारी जीवनमूल्ये स्वतःत गुंतवू शकतो. माणूस घडवण्याचा हा एक चांगला प्रयत्न होऊ शकेल, हा विश्‍वास आहे. म्हणून तर… ही विच्छा पुरी करा आणि व्यसनाला नाही म्हणण्याची, त्याविरोधी कायदा सक्तीचा करण्याची सुरुवात आपल्यापासूनच करूयात. एक व्यक्ती व्यसनमुक्त झाला तर त्याचे संपूर्ण कुटुंब अनेक प्रकारच्या त्रासापासून मुक्त होईल.

उमेश सूर्यवंशी
9922784065