नवी दिल्ली । व्यापमं घोटाळ्यात सीबीआयने देशभरातील साडेनऊ लाख विद्यार्थ्यांमधून सीबीआयने 634 बोगस परीक्षार्थी शोधून काढले आहेत. हे सर्व जण 2008 ते 2012 दरम्यान अन्य विद्यार्थ्यांच्या नावाखाली परीक्षेला बसले होते. प्रवेश परीक्षेत विद्यार्थ्यांनी हॉल तिकीटवरील छायाचित्र बदलून बोगस परीक्षार्थी पाठवले होते. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश आज रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 1990च्या सुमारास प्रथम यासंदर्भातील गैरव्यवहारांची चर्चा झाली. 2000 साली यासंदर्भात एक एफआयआरही पोलिसांनी दाखल केला. मात्र, हे कोणत्याही संघटित टोळीचे प्रकरण असावे, असे वाटण्यासाठी 2009 साल उजाडावे लागले. त्यावेळेस वैद्यकीय परीक्षेच्या झालेल्या घोटाळ्यामध्ये चौकशी झाली आणि सुमारे 100 जणांना अटकही झाली. 2013 साली प्रथमच हा घोटाळा म्हणजे एक मोठा हिमनगच असल्याचे लक्षात येण्यास सुरुवात झाली. या सर्व संघटित टोळीचा म्होरक्या असलेल्या जगदीश सागर याला अटक झाली. 26 ऑगस्ट 2013 रोजी या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांच्या एका विशेष लक्ष्य गटाची स्थापना मध्य प्रदेश सरकारने केली. मात्र घोटाळ्यातील मोठ्या नेत्यांची नावे आणि व्याप्ती बघता शेवटी या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. या घोटाळ्याशी संबंधित 48 जणांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याने हे प्रकरण मध्य प्रदेशमधील भाजप सरकारसाठी अडचणीचे ठरले आहे.