भोपाळ-मध्य प्रदेश विधानसभेसाठी मतदान झाल्यानंतर काँग्रेसने आता पक्षांतर्गत बदल करत नवीन नियुक्त्या सुरु केल्या आहेत. नवीन नियुक्तीत संजीव सक्सेना यांना पक्षाच्या राज्य सरचिटणीसपद देण्यात आले आहे. सक्सेना हे काही दिवसांपूर्वी व्यापमं घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात होते. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रप्रभाष शेखर यांनी सक्सेना यांची नियुक्ती पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशानुसार केल्याचे म्हटले आहे.
कॉंग्रेसने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे मेव्हणे संजय मसानी यांना वारा-सिवनी मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. काँग्रेसकडून नेहमी चौहान यांच्या नातेवाईकांवर व्यापमं घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला जातो. अशा परिस्थितीतही काँग्रेसने मसानी यांना उमेदवारी दिली. पक्षाच्या या निर्णयाची मोठी चर्चा होत आहे.
सक्सेना पक्षाविरोधात निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. पक्षाने त्यांना मोठी जबाबदारी देण्याचे आश्वासन दिले होते. सक्सेना यांना सरचिटणीस करुन पक्षाने या आश्वासनाची पुर्तता केल्याचे बोलले जात आहे.
तत्पूर्वी शिवराजसिंह चौहान माजी उच्च शिक्षण मंत्री आणि व्यापमं घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात जाऊन आलेले लक्ष्मीकांत शर्मा यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर दिसले होते. त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी शिवराजसिंह यांच्यावर टीका केली होती. कमलनाथ यांनी ट्विट करत शिवराजसिंह यांच्यावर निशाणा साधला होता.