Two shops were broken into in Chalisgaon चाळीसगाव : शहरातील भडगाव रोडवरील दोन दुकानांच्या छताचा पत्रा उचकावून चोरट्यांनी 90 हजारांची रोकड व इतर मुद्देमाल 21 रोजी रात्री लंपास केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
बंद दुकानांना चोरट्यांनी केले टार्गेट
शहरातील शास्त्री नगरमधील रहिवासी आशिष जैन यांचे भडगाव रोडवर नवकार गिफ्ट शॉप हे दुकान आहे. जैन हे 21 रोजी रात्री 9.20 वाजेच्या सुमारास व शेजारील स्वामी समर्थ ट्रेडर्सचे अतुल कोतकर हे रात्री 10 वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. 22 रोजी सकाळी 10 वाजता आशिष जैन हे दुकानात आले असता, त्यांना दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच दुकानाच्या छताच्या पत्र्याचे नटबोल्ट काढलेले दिसले. दुकानातील ड्रावरमधून 75 हजार रूपयांची रोकड गायब होती तर शेजारील स्वामी समर्थ ट्रेडर्सचेही पत्रे उचकावून 15 हजार रूपयांची रोकड चोरांनी लांबवली होती. पोलिस निरीक्षक के.के. पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. याप्रकरणी जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड तपास करत आहेत.