मुक्ताईनगर। शहरात असलेल्या जुन्या तलाठी कार्यालयाच्या जागेवर ग्रामपंचायततर्फे बहुउद्देशीय दुमजली व्यापारी संकुल बांधण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 75 लाख रुपये खर्चाचे हे संकुल उभारण्यासाठी ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडून 50 लाखांचे कर्ज घेतले आहे. हे कर्ज घेवून सात महिन्यांचा कालावधी उलटला तरी संकुलाच्या कामाला सुरुवात नाही. यामुळे भूमीपूजन होणार कधी? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. शहरात असे प्रशस्त संकुल उभे राहिल्यास येथील बेरोजगार तरुणांना देखील आपला व्यवसाय उभारण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध होऊन रोजगार निर्मितीस प्राधान्य मिळू शकते. सद्य स्थितीत काही बेरोजगारांनी आपल्या परिवाराचा उदनिर्वाह करण्यासाठी शहरात सार्वजनिक जागेवर तसेच रस्त्यालगत अवैधरित्या पत्री शेड उभारुन दुकानी थाटली आहेत. यामुळे शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने व्यापारी संकुल उभारल्यास काही प्रमाणात का होईना अतिक्रमणाचा प्रश्न सुटण्यास हातभार लागू शकेल.
निविदा काढताच तलाठी कार्यालय जमीनदोस्त
दुमजी व्यापारी संकुल बांधकामासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हा ग्रामविकास निधीतून 75 लाख रुपये खर्चाच्या कामाला जुलै 2016मध्ये प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. यापैकी 50 लाख रुपये जिल्हा परिषदेने कर्ज दिले असून उर्वरित 25 लाख ग्रामपंचायत स्वत: खर्च करणार आहे. दरम्यान, शहराच्या पूर्वीच्या एदलाबादच्या नकाशावर करमणूक केंद्र म्हणून उभ्या असलेल्या इमारतीमध्ये तलाठी कार्यालय होते. ही इमारत जीर्ण झाल्याचे कारण पुढे करून संबंधित विभागाने निविदा काढताच तलाठी कार्यालय जमीनदोस्त केले.
38 लाखांचा निधी परत
तलाठी कार्यालयाची इमारत पाडल्यानंतर या जागेवर व्यापारी संकुलासाठी 38 लाखांचा निधीदेखील मंजूर करण्यात आला होता. पंरतू वाढीव अंदाजपत्रकामुळे हा निधी परत गेला होता. परिणामी गावातील लहान-मोठे व्यावसायिक प्रवर्तन साई चौकात अतिक्रमण करून दुकाने थाटतात. या अतिक्रमणाने वाढलेला ताण पाहता ग्रामपंचायतीला दोनवेळा कारवाई करावी लागली. मात्र, ही समस्या सोडवण्यासाठी बहुउद्देशीय व्यापारी संकुलाची उभारणी गरजेची आहे. असे असले तरी भूमीपूजन होऊन कामाला सुरुवात कधी? हा प्रश्न सात महिन्यांपासून प्रलंबित विषय आहे. जुन्या तलाठी कार्यालयाच्या याच जागेवर व्यापारी संकुल होईल. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने कामाता दिरंगाई न करता लवकरात लवकर व्यापारी संकुलाच्या कामास गती देण्यात यावी अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांकडून होत आहे. जेणेकरुन बेरोजगार तरुणांना आपले रोजगार थाटण्यासाठी दारोदार हिंडावे लागणार नाही.
पुढार्यांची अनास्था
प्रशासकीय कामकाज म्हटले की, त्यात दिरंगाई हि आलीच त्याचाच फटका मुक्ताईनगर शहरात उभे राहू पाहणार्या व्यापारी संकुलाला पडत आहे. प्रशासनाच्या सुस्त काराभारामुळे जुलै 2016 मध्ये मान्यता मिळून देखील कामकाज अद्यापही सुरु होण्याचे नाव नाही, त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील याकडे लक्ष देऊन प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करुन काम सुरु करण्यास प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. मात्र राजकीय प्रतिनिधींची देखील याबाबत अनास्था दिसून येत आहे.