व्यापारी संकुलातील गाळेधारकांना लवकरच 81 ब ची नोटीस

0

जळगाव।  महानगर पालिका मालकीचे 18 व्यापारी संकुलातील 2 हजार 175 गाळेधारकांपैकी सुनावणी बाकी असलेल्या 1 हजार 700 गाळेधारकांना महापालिका प्रशासन लवकरच 81 ब’ नुसार सुनावणीची नोटीस बजावणार आहे. याबाबत नोटीस तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. महापालिकेच्या मालकीच्या 18 व्यापारी संकुलातील गाळेधारकांची मुदत 2012 ला संपुष्टात आलेली होती. त्यानुसार मनपाने पाचपट भाडे वसूल करण्यासाठी महासभेत ठराव क्रमांक (40) हा 19 डिसेंबर 2016 ला केला होता. त्यानुसार मनपाने प्रक्रिया राबवित असतांना गाळेधारकांनी राज्यशासनाकडे धाव घेतल्यानंतर या ठरावाला स्थगिती देण्यात आली होती.

कार्यवाही वर्षभरात पूर्ण होणार
अजून ही नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे सुनावणी होवून याबाबत अजूनही निर्णय अद्याप आलेला नाही. तसेच ठराव क्रमांक 40 ला स्थगिती दिल्याने मनपाच्या आर्थिक नुकसान झाल्याचे खंडपीठाने याबाबत शासनाला नोटीस दिली होती. तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी 81 ब ची कार्यवाही वर्षभरात पूर्ण करू असे न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यानुसार पाच सहा महिन्यापूर्वी 81 ब च्या कार्यवाहीनुसार 2 हजार 175 गाळेधारकांपैकी 600 गाळेधारकांच्या सुनावण्या घेण्यात आल्या होत्या. आता राहिलेले 1 हजार 700 गाळेधारकांना 81 ब’ ची नोटीस बजावून त्यांच्या सुनावण्या घेवून त्यांचे म्हणणे ऐकून निर्णय दिला जाणार आहे.