पुणे । व्यापारी वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न काँग्रेसने सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा पुणे दौरा आयोजित करण्यात आला आहे.
जीएसटी विषयावर चिदंबरम यांचे भाषण आयोजित केले असून मुकुंदनगर येथे रविवार (23 जुलै) सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी याकरीता व्यापारी वर्गाला निमंत्रणे दिली आहेत. व्यापारी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळात असल्याचे असे एका पदाधिकार्याने सांगितले.
जकात हटाव अशा मागणीसाठी व्यापारी वर्गाने महाराष्ट्रात मोठे आंदोलन केले होते. तेव्हापासून हा वर्ग काँग्रेसच्या विरोधात जाऊ लागला. काँग्रेसने एलबीटी पर्याय आणला परंतु तोही फारसा मान्य झाला नाही. उलट काँग्रेसच्या विरोधात असंतोष अधिकच वाढला. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशभर व्यापार्यांनी भाजपला साथ दिली. त्यामुळे भाजपला केंद्रात प्रथमच बहुमत गाठता आले. त्यापाठोपाठ झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये व्यापारी भाजपबरोबर राहिले. काँग्रेसने व्यापारी वर्गातील काही उमेदवार दिले पण त्यांचाही भाजपपुढे निभाव लागला नाही.
गेल्या काही दिवसापासून व्यापारी वर्ग मात्र मोदी सरकारच्या विरोधात बोलू लागला आहे. त्याची दखल काँग्रेस नेतृत्वाने घेतली. मनमोहनसिंग सरकार आणि मोदी सरकार अशी तुलना होऊ लागली आहे. जीएसटीविषयी प्रतिक्रिया उमटू लागल्यावर काँग्रेसने व्यापारी बैठका आणि नेत्यांचे दौरे असा कार्यक्रम आखला. पुण्यात होणारा चिदंबरम यांचा दौरा हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्राचे याकडे लक्ष वेधले गेले आहे.