व्यापार्‍यांसाठी नवीन मार्केट

0

धुळे । राज्यात शहरातील पाचकंदील परिसरातील कापड बाजार, धान्य बाजार, फ्रुट मार्केट, भाजी मार्केट या पाचही मार्केटमधील व्यावसायीकांचे पुनर्वसन करून त्यांच्यासाठी दिड एकर जागेवर भव्य मार्केट उभारण्याचा निर्णय नूकताच झालेल्या नाशिक महसूल आयुक्तांच्या बैठकीत घेण्यात आले असल्याची माहिती आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपचे सुनिल नेरकर, भीमसिंग राजपूत, तेजस गोटे, दिलीप साळुंके आदी उपस्थित होते. महानगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीने तत्कालीन ठेकेदार बोरसे यांच्या समवेत करार केला आहे. सदर करारास शंभर वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून अस्तित्वात असलेल्या व पिढ्यान् पिढ्या ताब्यात असलेल्या तसेच हजारो कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या पाचकंदील मार्केटमधील पाचपैकी एकच भाजी मार्केट पाडून रिक्त होणार्‍या जागेवर नवे मार्केट उभारण्याचा निर्णय केल होता. सदर मार्केट बीओटी तत्वावर बांधण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

2018 मध्ये मिळणार ताब्यात
नविन व्यापारी संकुलाचे काम पुर्ण झाल्यावर अपर ग्राऊंड फ्लोअरवरील प्रत्येकी एक दुकान व्यापार्‍यांना देण्यात येणार आहे. त्याकरीता दुकानासाठी शासकीय रेडीरेकनरच्या दराने दुकानाची किंमत ना परतावा, लिज प्रिमीयम रक्कम म्हणून विकासकास द्यावयाची आहे. तसेच आपणास कराराप्रमाणे दुकानाचे भाडे मनपाला द्यावे लागणार आहे. नविन व्यापारी संकुलातील दुकानाचा कब्जा 31 मार्च 2018 पावेतो देण्याचे नक्की झाले आहे.

व्यापार्‍यांना नोटीस
हजारो कुटूंबाच्या जीवनाशी निगडीत असलेल्या मार्केट प्रश्‍नाबाबत निर्णय घेतांना सदर व्यावसायीकांना विश्‍वासात घेणे आवश्यक होते. परंतू त्यांना पुर्वकल्पना न देता पालिकेतील राष्ट्रवादीच्या सत्ताधार्‍यांनी परस्पर टेंडर काढून मे.बोरसे ब्रदर्स इंजि.अ‍ॅण्ड कॉन्ट्रॅक्टर प्रा.लि.या कंपनीला 24 फेबु्रवारी 2014 रोजी काम सुरु करण्याचा आदेश दिला. तद्नंतर 10 एप्रिल 2017 रोजी भाजीबाजारातील (लाल बहाद्दुर शास्त्री मार्केटमधील) व्यापार्‍यांना नोटीस देण्यात आली.

मुदत संपली
व्यापार्‍यांना देण्यात आलेल्या नोटीस जाचक स्वरुपात होती. या नोटीसीत सद्यस्थितीत असलेल्या कै.लाल बहाद्दुर शास्त्री, भाजी मार्केट येथे दुकान चालवित आहेत त्याची मुदत दुकानांची मुदत 16 एप्रिल 2015 रोजी संपलेली आहे. धुळे मनपाने येथे खाजगीकरणाच्या माध्यमातून नविन व्यापारी संकुल बांधण्याचा निर्णय घेतला असून तेथे नविन बांधकामा संबंधी निविदेच्या कायदेशीरबाबी पुर्ण करून काम मे.बोरसे कंपनीला देण्यात आले आहे.

शहराच्या वैभवात पडणार भर
नाशिक येथे आयुक्त महेश झगडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापौर कल्पना महाले, आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, महापालिका अभियंता कैलास शिंदे, नगररचनाकार चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी पाचकंदील परिसरातील सर्व दुकानदारांच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रफळाचा गाळा विनामूल्य देण्याचा धाडसी निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आदर्श पुनर्वसन या दीड एक जमिनीवर चार मजल्यांची भव्य इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने यामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. यापुढील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास सचिव मनिषा म्हैसकर आदी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या समवेत मंत्रालय पातळीवर घेतले जातील, असेही यावेळी आमदार गोटे यांनी सांगीतले.