चिंचवड : नवीन हॉस्पिटल सुरू करून त्याशेजारी मेडिकल दुकान सुरू करण्याचे आमिष दाखवून दोघांकडून तब्बल 46 लाख 65 हजार रुपये घेतले. नंतर हॉस्पिटल सुरू होणार नसल्याचे सांगत फसवणूक केली. हा प्रकार 15 जून 2016 पासून 23 डिसेंबर 2018 या कालावधीत घडला. संतोष वरे (वय 35, रा. मोशी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राया भोसले (वय 38, रा. मोशी), डॉ.प्रमोद बोरघरे (वय 34, रा. भंडारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष व्यापारी आहेत. आरोपी राया आणि डॉ. प्रमोद यांना एमआयडीसी डी ब्लॉक चिंचवड येथे हॉस्पिटल सुरू करायचे आहे. त्या हॉस्पिटलमध्ये फिर्यादी संतोष आणि त्यांचे नातेवाईक राजेंद्र मारुती बोंबी यांना मेडिकल दुकान सुरू करून देतो, असे सांगत त्यांच्याकडून वारंवार आरटीजीएस, चेक आणि रोख स्वरूपात एकूण 46 लाख 65 हजार रुपये घेतले. त्यानंतर अचानक हॉस्पिटल बंद झाल्याचे सांगितले. त्यामुळे संतोष यांनी पैसे परत मिळविण्यासाठी आरोपींकडे पाठपुरावा केला असता आरोपींनी संतोष यांना रक्कम शिल्लक नसलेल्या बँक खात्याचे चेक दिले. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संतोष यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.