कल्याण । टाटा पावर ते खंबाळपाडा येथील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात पडून ललीत जैन या व्यापार्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात संबंधित जबाबदार अधिकारी व ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर सबंधित जबाबदार अधिकार्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. संघवी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि या घटनेतील दोषींवर कारवाई कडक करावी अशी मागणी करण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी संघटना, नागरिक आणि संघवी कुटुंबियांचे नातेवाईकांनी डोंबिवली एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी कार्यालयात महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळाचे अधिकारी, पालिकेचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना नागरिकांनी चांगलेच झापले.
अधिकार्यांनी जबाबदारी झटकली
डोंबिवली पूर्वेकडील घरडा सर्कल येथून काढण्यात आलेल्या या मोर्चात मार्बल स्टोर आणि रिटेलर्स वेलफेयर असोसिएशन, परिसरातील व्यापारी, नागरिक, मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम आणि गटनेते प्रकाश भोईर, शिवसेना नगरसेवक व सभागृह नेता राजेश मोरे, भाजप नगरसेवक महेश पाटील, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत, आरपीएचे पदाधिकारी माणिक उघडे आदी सहभागी झाले होते. या मोर्चेकर्यांनी थेट डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात कार्यकारी अभियंता एस.एस.ननावरे महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळाचे अधिकारी, पालिकेचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याबरोबर सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिकांनी चर्चा केली. यावेळी उपस्थित अधिकारी एकमेकांवर बोटे दाखवत असल्याचा आरोप यावेळी राजकीय पदाधिकार्यांनी केला.
कारवाईची मागणी
ललित जैन यांचा मृत्यू ज्या रस्त्यातील खड्यात पडून झाला होता. त्या ठिकाणी अजूनही पाहणी करण्यासाठी गेले नसल्याने नागरिक यावेळी संतापले होते. ज्या ठिकाणी ही घटना घडली. तो रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यातरीत अशी घटना घडू नये म्हणून या सर्व विभागाने का लक्ष दिले नाही असा आरोप यावेळी नागरिक आणि व्यापार्यांनी केला. संघवी यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या घटनेला जबाबदारी असलेल्या संबंधित अधिकार्यांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
अधिकार्यांमध्ये एकमत नाही
15 जून 2014 रोजी 27 गावे पालिकेत समाविष्ट झाले असले तरी या गावातील रस्ते नेमके कोणाकडे आहेत. यावर पालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील आणि एमआयडीचे कार्यकारी अभियंता ननवरे यांच्यात एकमत झाले नाही. पालिकेत गेल्यावर 27 गावातील रस्ते पालिकेकडे आहेत असा दावा ननवरे यांनी यावेळी केला. तर पाटील यांनी मात्र एमआयडीसीने ज्यावेळी पालिकेला पत्र दिले होते. त्यावेळी याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यासाठी सांगितले असता एमआयडीसी विभागाने लक्ष दिले नाही असा आरोप केला.
मनसेचा आक्रमक पावित्रा
यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी याप्रकरणी हे चारही प्राधिकरण दोषी असून व्यापार्याचा मृत्यू होऊन आठवडा उलटला तरी अद्याप त्यांनी घटनास्थळी भेट दिलेली नाही. लवकरात लवकर ललित जैन यांच्या कुटुंबियांना आर्थिक भरपाई मिळाली नाही आणि दोषींवर कारवाई झाली नाही तर मनसे त्याविरोधात आंदोलन छेडणार असा इशारा दिला आहे.