व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीला केले चोवीस तासात जेरबंद

0

धुळे : ऊस तोडणी कामगार पुरवितो, असा बहाणा करुन चाळीसगावच्या तीन व्यापार्‍यांना दरोडेखोरांच्या टोळीने भरदिवसा निजामपूर रस्त्यावरील म्हसाई माता मंदिराजवळ मारहाण करुन लुटले. घटनेची माहिती मिळताच अवघ्या २४ तासाच्या आत टोळीतील चार दरोडेखोरांना निजामपूर पोलिसांनी अटक केली आहे. चारही दरोडेखोर जामदे ता. साक्री परिसरातील आहेत. अटकेतील दरोडेखोरांकडून दोन मोटरसायकल, दोन मोबाईल व १९ हजार ५०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणी निजामपून पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

मारहाण करून लुटला ऐवज
गुलाब मोहन पाटील रा.वाकडी ता.चाळीसगाव हे ऊस तोडणी मुकादम आहेत. त्यांना व त्यांच्या मित्रांना ऊस तोडणीस कामगारांची आवश्यकता असते. यामुळे ते कामगारांचा शोध घेत होते. त्याच वेळेस’ऊस तोडणीसाठी कामगार पुरवितो. तुम्ही पैसे घेवून निजामपूर येथे या असे अक्षय सुहास पवार रा. जामदे ता.साक्री याने मुकादम पाटील यांच्यासह किरण भिमराव जाधव, निलेश गणपत राजपूत यांना सांगितले. ठरल्याप्रमाणे पाटील, जाधव, राजपूत हे दि.२७ रोजी निजामपूर रस्त्यावरील म्हसाई माता मंदिराजवळ गेले. मात्र, याठिकाणी अक्षयसह त्याचे साथीदार अगोदरपासूनच दबा धरुन बसले होते. काल दुपारी तीन वाजता मुकादम पाटीलसह चाळीसगावचे तीनही व्यापारी तेथे पोहोचताच अक्षयसह दरोडेखोरांनी पाटील, जाधव, राजपूत यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांना मारहाण करुन चार मोबाईल,१९ हजार ५०० रुपयांची रोकड जबरदस्तीने लुटली. त्यानंतर सहा दरोडेखोर तेथून पसार झाले.

पोलिसांच्या कामगिरीचे होत आहे कौतुक
भयभीत झालेल्या मुकादम पाटील यांनी थेट निजामपूर पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार व दरोडे खोरांचे वर्णन पोलिसांना सांगितले सविस्तर माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पटले यांनी तात्काळ स्वतः दरोडेखोरांचा शोध घ्यायला सुरवात केली. त्यात त्यांना यश आले. अक्षय सुहास पवार (वय २४), संजेश प्रजा चव्हाण (वय २४), गांजू करणसिंग चव्हाण (वय २७),नितेश जहांगी चव्हाण (वय २६) सर्व रा.जामदे ता.साक्री यांना अटक केली असून कृष्णा अशोक,शेखर दादाभाई भोसले यांचा पोलीस शोध घेत आहेत. अटकेतील दरोडेखोरांकडून चार मोटरसायकल, चार मोबाईल, १९ हजार ५०० रुपयांची रोकड असा २ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस अधीक्षक चैतन्या एस.,अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, साक्री डिवायएसपी निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अर्जुन पटले व कर्मचार्‍यांनी यांनी अवघ्या २४ तासाच्या आत दरोडेखोरांना जेरबंद केल्याने त्यांच्या कामगिरीचे कौतूक होत आहे.