नाशिक : जिममध्ये व्यायाम करताना एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या उत्तमनगर परिसरात घडली आहे. अजिंक्य लोळगे असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.याविषयी अधिक माहिती अशी, उत्तमनगर परिसरातील ’बॉडी झोन’ जिममध्ये अजिंक्य व्यायाम करण्यासाठी गेला होता.
व्यायाम करत असताना तो ऊठून उभा राहिला. काहीतरी होत असल्याचे जाणवल्याने त्याने भिंतीला टेकून उभे राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक चक्कर आल्याने तो जागीच कोसळला. त्याला जवळच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण उपचार सुरु होण्यापूर्वीच अजिंक्यचा मृत्यू झाला होता. अजिंक्यने तीनच दिवसांपूर्वी जिम जॉईन केली होती असे सांगण्यात येत आहे. अजिंक्य आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.