व्यावसायिक वाहनांसाठीही तीन वर्षांचा विमा

0

निर्णयाचा फेरविचार करण्याची वाहतूकदारांची मागणी

पुणे : खासगी वाहनांबरोबरच व्यावसायिक वापराच्या नवीन वाहनांसाठी नोंदणी करताना तीन वर्षांचा किमान थर्ड पार्टी विमा काढणे बंधनकारक आहे, असा आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने दिला आहे. त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीच्या सूचनेनुसार 1 सप्टेंबरपासून नवीन वाहनांसाठी काढावयाच्या विम्यात बदल करण्यात आला आहे. दुचाकींसाठी पाच वर्षे आणि चारचाकी वाहनांसाठी तीन वर्षे मुदतीचा विमा काढावा लागत आहे. समितीने भारतीय विमा नियामक प्राधिकरणाला (इर्डा) त्यासंबंधीची सूचना केली होती. हा निर्णय केवळ खासगी वापराच्या वाहनांसाठी होता. त्यात व्यावसायिक वापराच्या वाहनांचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, आता त्यामध्ये व्यावसायिक वापराच्या वाहनांनाही नियम लागू करण्याचा आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने दिला आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नवीन व्यावसायिक वाहनांची नोंदणी करताना शुक्रवारपासूनच तीन वर्षांच्या विम्याचे बंधन घातले. त्यामुळे शुक्रवार व्यावसायिक वाहनांची नोंदणी होऊ शकली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

वाहतूकदार संघटना कोर्टात जाणार

दरम्यान, व्यावसायिक वापराच्या वाहनांसाठी सुरुवातीला तीन वर्षे मुदतीचा विमा काढणे बंधनकारक केल्याने वाहतूकदारांचे कंबरडे मोडणार आहे, असे मत महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी व्यक्त केले आहे. तसेच, या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी त्यांनी केली असून, त्यासाठी कोर्टातही धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.