पटणा । राजधानी पटणामधील दिघा येथील एका यज्ञ सोहळ्यातील कार्यक्रमादरम्यान व्यासपीठ तुटल्यामुळे लालूप्रसाद यादव जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर लालूप्रसाद यांना तत्काळ शहरातील इंदिरा गांधी वैद्यकीय संस्थेत दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर लालू यांची प्रकृती ठीक असून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लालू प्रसाद यांच्याशी फोनवरून संपर्क साधत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
व्यासपीठावर जास्त गर्दी झाल्यामुळे ते तुटल्याचे सांगण्यात आले आहे. उपचारांसाठी रुग्णालयात नेत असताना, कमरेच्या खालच्या भागात झालेल्या जखमेमुळे सूज आली असल्याचे लालूप्रसाद यादव यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. रुग्णालयात लालूप्रसाद यांच्यासोबत त्यांचे धाकटे चिरंजीव आणि राज्याचे उप मुख्यमंत्री तेजस्वी यादव, राज्याचे वैद्यकीय मंत्री आणि जेष्ठ चिरंजीव तेज प्रताप यादव, मोठी मुलगी आणि राज्यसभेच्या खासदार मीसा भारती उपस्थित होत्या.