पुरुषोत्तम पाटील म्हणजेच रसिकांचे लाडके ‘पुपा’जी यांच्या निधनाने मराठी काव्यावर निरातिशय प्रेम करणारे एक महनीय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. धुळ्यासारख्या तसं म्हटलं तर मुंबई-पुणेकरांसाठी आडवळणाच्या शहरातून गेली तीन दशके अव्याहतपणे सुरू ठेवलेले ‘कविता-रती’ हे मासिक त्यांच्या या निस्सीम काव्यप्रेमाची ग्वाही देणारे ठरले आहे.
एखाद्या विषयाला समर्पित असणारे नियतकालिक ही बाब मराठीला नवीन नाही. मात्र जिथे मुळातच काव्यसंग्रह मर्यादित प्रमाणात खपतात अशा भाषेत काव्यालाच समर्पित असणारे मासिक चालवणे ही सोपी बाब नाही. याचा विचार करता तब्बल तीन दशकांपर्यंत फक्त कविता-एके-कविता अशा पद्धतीने प्रकाशित होणारे ‘कविता-रती’ हे मासिक एक आश्चर्य म्हणून गणले जाते. अर्थात याचे सर्वश्री श्रेय पुरुषोत्तम पाटील यांच्या अथक परिश्रमालाच आहे. पुपाजींनी नुकताच शेवटचा श्वास घेतला. 1985 पासून त्यांनी अव्याहतपणे ही काव्ययात्रा सुरू ठेवली. पुपाजींच्या आयुष्यात ‘कविता-रती’पूर्व आणि ‘कविता-रती पश्चात’ असे दोन कालखंड असल्याचे आपल्याला दिसून येते. पहिला टप्पा कवि पुरुषोत्तम पाटील यांची जडणघडणीचा होता. पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना त्यांना काव्याची आवड निर्माण झाली. त्या कालखंडात पुण्यात वास्तव्यास असणार्या कविवर्य बा.भ. बोरकर यांचा त्यांना सहवास लाभला. त्यांनी या तरुणाच्या प्रतिभेला पैलू पाडले. यातच पुरुषोत्तमजींचे अतिशय सुंदर आणि दाणेदार असे हस्ताक्षर पाहून बोरकरांनी त्यांना आपले लेखनिक म्हणून काम करण्याची संधी दिली. जवळपास तीन वर्षांपर्यंत ते बोरकरांच्या कुटुंबातील एक सदस्य बनले होते. अर्थातच त्यांच्या सृजनावर बोरकरांचा प्रभाव पडला. त्यांच्या काव्यात प्रेमाची विविध रूपे आपल्याला दिसून येतात. यातून त्यांची कविता बहरली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी प्रारंभी बहादरपूर (ता. पारोळा) येथे शिक्षकाची नोकरी पत्करली. यानंतर दुसरीकडे प्राध्यापक व प्राचार्यपदाची धुरादेखील सांभाळली.
काव्यावर अतिशय प्रेम करणारे पाटील हे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. असंख्य विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत त्यांचा हात होता. विद्यार्थ्यांच्या संगतीत आणि नंतर संस्था उभारणीत व्यस्त झाल्यानंतरही त्यांचे काव्यप्रेम तसूभरही कमी झाले नाही. मात्र, आयुष्यातील एका दुर्घटनेमुळे त्यांच्यावर कोलमडून पडण्याची वेळ आली. पुपाजींच्या तरुण मुलाचे अकाली निधन झाले. यामुळे त्यांच्या पत्नीवर प्रचंड मानसिक आघात झाला. या दुहेरी आपत्तीमुळे खरं तर कुणीही खचून गेला असता. मात्र, पुपाजी यातून बाहेर आले आणि त्यांनी आपले उर्वरित आयुष्य फक्त आणि फक्त कवितेलाच समर्पित करण्याचा संकल्प केला. यातूनच ‘कविता-रती’चे बीजारोपण झाले. कविवर्य बा.भ. बोरकर यांच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून 30 नोव्हेंबर 1985 रोजी या नियतकालिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. मराठी साहित्यक्षेत्रात ‘कविता-रती’चे आगमन होत असतानाचे वातावरण लक्षात घेण्याची गरज आहे. मराठीत साठच्या दशकात लघू-अनियतकालिकांची चळवळ उदयास आली. प्रस्थापितांच्या मिरासदारीला टक्कर देत यातून मराठीला समृद्ध करणारे नवीन प्रवाह समोर आले. यामुळे अनेक साहित्यिक उदयास आले. साठच्या दशकातील ही चळवळ ‘कविता-रती’चे आगमन होण्याआधीच लयास गेल्याचे स्पष्ट झाले होते. विशेष करून 1982 साली ‘सत्यकथा’ बंद पडले होते. या पार्श्वभूमीवर फक्त काव्याला समर्पित असणारी ‘कविता-रती’ तग धरणार का? अश प्रश्न होता. मात्र, हे रोपटे रुजलेच नाही तर त्याचा डेरेदार वृक्षदेखील बनला. विशेष म्हणजे मराठीच्या सर्व काव्य प्रवाहांना त्याने सामावून घेतले.
‘कविता-रती’मध्ये कवितेशी संबंधित सर्व काही प्रकाशित होत असते. अनेकदा या नियतकालिकाने विख्यात कविंवर विशेषांक काढले. गत 31 वर्षांमध्ये सहाशेपेक्षा जास्त कविंच्या तब्बल तीन हजारांवरील कविता यात प्रकाशित करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून अनेक प्रतिभावंत कवि मराठी जनांसमोर आले आहेत. पुपाजी हे अतिशय उच्च कोटीचे काव्य समीक्षक व रसिक होते. यामुळे आपल्या नियतकालिकात सरस सृजनालाच त्यांनी प्राधान्य दिले. परिणामी, ‘कविता-रती’मध्ये कविता छापून येणे हे त्या कविच्या सृजनाला मान्यता मिळणे असे मानले जाऊ लागले होते.
आज तीन दशकानंतरही हा लौकिक कायम असल्याची बाब आपण लक्षात घेण्याची गरज आहे. अर्थात हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हताच. ‘कविता-रती’वर अनेकदा अरिष्टे आली. विशेष करून आर्थिक अडचणींमुळे याच्या प्रकाशनात अनेकदा व्यत्यय आला. मात्र, पुपाजींनी या खाचखळग्यांमधून मार्गक्रमण करत आगेकूच सुरूच ठेवली. परिणामी, आजच्या अत्याधुनिक संपर्क यंत्रणांच्या युगातही हे नियतकालिक टिकलेच नव्हे, तर मराठीचे वैभव बनले आहे. इतरांच्या लिखाणास जगासमोर आणणार्या पुरुषोत्तम पाटील यांनी स्वत: मोजकेच मात्र अतिशय कसदार लिखाण केले. ‘तळ्यातल्या सावल्या’ आणि ‘परिदान’ हे दोन काव्यसंग्रह तर ‘तुकारामाची काठी’ आणि ‘अमृताच्या ओळी’ हे वर्तमानपत्रीय सदरांमधून आकारास आलेले लेखसंग्रह हीच त्यांची ग्रंथसंपदा. मात्र, याच्या जोडीला कविता हाच अक्षरश: त्यांचा श्वास होता. खान्देशला तेजस्वी काव्य परंपरा आहे. याचप्रमारे काव्याच्या संगोपनातही याच भागातील दोन मान्यवरांनी भरीव कामगिरी केली आहे. जळगाव येथील नानासाहेब फडणीस यांनी जवळपास 50 वर्षांपर्यंत ‘काव्य रत्नावली’ हे काव्याला समर्पित असणारे नियतकालिक चालवले होते. हा वारसा पुपाजींनी अतिशय समर्थपणे चालवला. त्यांच्या निधनाने आता ‘कविता-रती’ पोरके झाले आहे. मात्र, सुदैवाने प्रा. आशुतोष पाटील यांच्यासारख्यांकडे त्यांनी हा वारसा सुपुर्द केला असून, तो त्यांनी समर्थपणे चालवला आहे. येणार्या काळातही ‘कविता-रती’ अशाच पद्धतीने बहरत ठेवणे हीच खरी कविवर्य पुरूषोत्तम पाटील यांनी श्रद्धांजली ठरणार आहे.