व्हर्च्युअल जगात वास्तव विसरून चालणार नाही; राहुल गांधींचा पुण्यातील विद्यार्थ्यांना सल्ला

0

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज पुण्यात आले आहे. त्यांनी पुण्यामध्ये पाच हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली. यादरम्यान, सोशल मीडिया आणि त्यावर निर्माण झालेले व्हर्च्युअल जग तसेच त्यावरून सुरू असलेले राजकारण याबाबत राहुल गांधी यांना विचारणा करण्यात आली त्यावेळी ते म्हणाले की, ”वास्तवापासून तुम्ही पळू शकत नाही. ज्यांना व्हर्चुअल रियालिटीमध्ये जगायचे आहे, त्यांना जगू द्या. मात्र अखेरीस त्यांना वास्तवाचा स्वीकार करावाच लागेल.” तसेच द्वेश, क्रोध आणि हिंसा यामुळे कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही. झाले तर नुकसानच होते, असा सल्ला राहुल गांधी यांनी दिला.

पुण्यातील महालक्ष्मी लॉन्सवर राहुल गांधींच्या विद्यार्थ्यांशी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. हा राजकीय स्वरूपाचा कार्यक्रम नसल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. हडपसरमधील महालक्ष्मी लॉन्सच्या हॉलबाहेर विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी उपस्थितांसाठी संगीत-नृत्य कार्यक्रमही झाले. या संवाद कार्यक्रमाला शहरातील काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. तत्पूर्वी, पुण्यातील आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे, पार्थ पवार, अमोल कोल्हे, मोहन जोशी यांनी कोरेगाव पार्कमधील हॉटेल वेस्ट इन येथे राहुल गांधींची भेट घेतली.