व्हायरल असत्य: राहुल गांधींच्या रॅलीतील ‘ते’ झेंडे पाकिस्तानचे नाही

0

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल केरळमधील वायनाड येथून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी रॅली काढण्यात आली होती, दरम्यान या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरून राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीकाही करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र ते झेंडे पाकिस्तानचे नव्हतेच. इंडियन यूनियन मुस्लिम लीग या केरळमधील प्रादेशिक पक्षाचा तो झेंडा असून हा पक्ष केरळमध्ये काँग्रेसचा मित्र पक्ष आहे.

राहुल गांधी यांनी काल गुरुवारी वायनाड लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. यावेळी प्रचंड मोठी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत इंडियन यूनियन मुस्लिम लीगचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. यावेळी चांद-तारा असलेले हिरवे झेंडे घेऊन हे कार्यकर्ते मोठमोठ्याने घोषणा देत होते. २५ सेकंदाचा हा व्हिडिओ सर्व सोशल मीडियावर व्हायर झाला. या व्हिडिओतील झेंडे पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाशी मिळते जुळते असल्याने अनेकांना हे झेंडे पाकिस्तानचेच असल्याचा भास होत होता.