व्हायरल फोटोमागची खरी कहाणी तेज बहादूर जिवंत आहे

0

नवी दिल्ली। सीमा सुरक्षा दलाचा कॉन्स्टेबल तेज बहादूर यादव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी मात्र तो त्याच्या मृत्यूच्या बातमीमुळे ट्विटरपासून फेसबुकवर गाजत आहे. सीमा सुरक्षा दलातील जवानांना निकृष्ठ जेवण देण्याच्या संदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणार्‍या तेजबहादूरच्या मृत्यूची बातमी वार्‍यासारखी पसरत असताना पण प्रत्यक्षात मात्र वेगळीच कहाणी समोर आली.

सीमा सुरक्षा दलात निकृष्ठ जेवण दिले जात असल्याचा पोल खोल करणार्‍या तेज बहादूरचा खून करण्यात आला असल्याची बातमी बुधवारपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र सोशल मीडियावर शेअर होत असलेला काही छायाचित्रांचा कोलाज पाकिस्तानी नागरिकांनी तयार केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कोलाजमध्ये तेजबहादूरचे एक छायाचित्र असून ते त्याच्या एका व्हिडिओमधून घेण्यात आले आहे. याशिवाय चेहर्‍यावर रक्त असलेला आणि झाकून ठेवलेला एका मृत व्यक्तीचे छायाचित्र त्यात आहे. मात्र, चेहरा झाकून ठेवलेले छायाचित्र छत्तीसगडमध्ये शहीद झालेल्या जवानाचे असल्याचे उघड झाले आहे.

सीमा सुरक्षा दलाने याप्रकरणाची त्वरित दखल घेत तेज बहादूर सिंग पूर्णपणे व्यवस्थित असून, तो सध्या जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असल्याचा खुलासा केला आहे. त्यानंतर तेजबहादूर सिंग यांच्या पत्नीनेही हा व्हिडिओ अफवा असल्याचे सांगितले. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणेने तेज बहादूरच्या फेसबुक अकाउंटची तपासणी केली असता, त्याचे 17 टक्के मित्र पाकिस्तानी असल्याचे आढळून आले आहे.