व्हिडीओ कॉलद्वारे मुलींनी घेतले पित्यांचे अंतिम दर्शन

0

नवापूर: कोरोनामुळे सर्वच हैराण झाले असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मनुष्यामधील अंतरासह भेटही दूर होऊ लागल्याचे दिसत आहे. दुःखाच्या प्रसंगालाही मृत व्यक्तीचे दर्शनही होऊ शकत नसल्याने मोबाईलच्या व्हिडीओ कॉलिंगचा उपयोग होत आहे. नवापूर शहरात एक अशीच दुःखद घटना घडून वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर मुलींनी व्हिडीओ कॉलिंगद्वारे वडिलांचे अंतिम दर्शन घेतल्याची प्रथमच घटना घडली. दरम्यान, लॉकडाऊनमुळे मुलींना अर्ध्या रस्त्यावरुन घरी परतावे लागले. त्यामुळे जन्मदात्या वडिलांचे अंतिम दर्शनही घेता येऊ शकले नसल्याची खंत मुलींमधून व्यक्त होत आहे.
सविस्तर असे, शहरातील बेलदार वाड्यात राहणारे भाजीपाला विक्रेते आनंदा काशिराम भोई यांचे दुपारी दीड वाजेच्या सुमारास निधन झाले. लॉकडाऊन आणि सीमा बंदी असल्याने त्यांच्या तिन्ही मुलींना नवापूर शहरात वडिलांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी येता आले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव मुलींनी व्हिडिओ कॉलिंगद्वारे वडिलांचे अंतिम दर्शन घेतले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आनंदा भोई यांच्यावर अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
नवापूर शहरातील प्रसिद्ध व्यापारी धाकू भोई यांचे भाऊ व बापू भोई यांचे मामा भाजीपाला विक्रेते आनंदा काशीराम भोई यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. समाजातील नागरिकांसह नातेवाईकांना दुःखद बातमी कळविण्यात आली.

तिन्ही मुलींनी केला अनेक अडचणींचा सामना
वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच गुजरात राज्यातील निझर येथील राधाबाई भोई, नाशिक जिल्ह्यातील जायखेडा येथील सरलाबाई भोई, सुरत जिल्ह्यातील चल्थान येथील उषाबाई भोई नवापूर येथे येण्यासाठी निघाल्या. त्यांना येण्यासाठी अशा प्रसंगी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिन्ही मुलींना लवकर येणे शक्य होणार नव्हते. जागोजागी त्यांची विचारपूस करून त्यांना अडविण्यात आले. त्यामुळे मुलींना अर्ध्या रस्त्यावरून घरी परतावे लागले. अखेर नाईलाजास्तव व्हिडिओ कॉलद्वारे वडिलांचे मुलींनी अंतिम दर्शन घेतल्याचा दुर्दैवी प्रसंग तिन्ही मुलींवर आला. अंत्ययात्रेत सहभागी सर्वांनी मास्क लावले होते. यावेळी सोशल डिस्टन्सचेही पालन करण्यात आले. मयत आनंदा भोई यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.