प्रभाग 2 मध्ये समस्या जैसे थे !

0

जळगाव: शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवाजीनगर,उस्मानिया पार्क,दालफळ,प्रजापतनगर आणि कांचननगरातील काही भाग या प्रभागात समावेश आहे. या प्रभागातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी परिसरातील समस्यांबाबत नागरिकांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधीविरुध्द रोष व्यक्त केला. परिसरात आयुक्तांचा बंगला आहे,माजी नगराध्यक्ष,माजी आमदारांचा बंगला आहे.मात्र सुविधांची वानवा आहे. काही भाग वगळता साफसफाई होत नाही,गटर स्वच्छ केली जात नाही,रस्त्यात खड्डेच खड्डे आहे.गेल्या 40 वर्षापूर्वी परिस्थिती आहे की काय असे वाटत आहे. जीर्ण झालेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने आणि पर्यायी रस्ता नसल्याने येथील नागरिकांना रेल्वे रुळावरुन किंवा रेल्वेच्या दादर्‍यावरुन वापर करावा लागत आहे. तसेच सुरत रेल्वे गेटकडून वळसा घालून वाहनधारकांना जावे लागते.

नागरिकांच्या नशिबी समस्याच!
मनपा प्रशासनाचे प्रमुख असलेले आयुक्त यांचा बंगला, माजी मंत्री आणि माजी महापौरांचे वास्तव्य याच भागात आहे. वास्तविक पाहता मुलभूत सुविधा प्रत्येकांना देणे अपेक्षित आहे. मात्र काही विशिष्ट भाग वगळता अन्य भागात समस्या जैसे थे आहे. रस्ते नाही,गटारी तुबंल्या आहेत.साफसफाईसाठी एकमुस्त ठेका दिला आहे. मात्र त्याचा काहीही फायदा नागरिकांना होतांना दिसत नाही. सामान्य नागरिकांचे कोणीही ऐकून घेत नाही अशीच काहीशी परिस्थिती आहे. आम्हाला मुलभूत सुविधा मिळत नसतील तर कर का भरावा?असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करीत आहेत.मनपा प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी मुलभूत सुविधा तरी उपलब्ध करुन द्याव्यात अशी माफक अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लोकप्रतिनिधींकडून नागरिकांची दिशाभूल
शिवाजीनगर पुलाची जीर्ण अवस्था झाल्यामुळे नवीन उड्डाण पुल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार पुलाचे काम सुरु करण्यात आले आहे. काम सुरु करण्यापूर्वी बळीराम पेठेतील ब्राम्हण सभेजवळ किंवा तहसील कार्यालयाजवळ पर्यायी मार्ग करुन देण्याच्या मागणीसाठी शिवाजीनगरातील रहिवासीयांची मागणी होती. परंतु ही मागणी पुर्ण न झाल्याने शिवाजीनगरातून शहरात येण्या-जाण्यासाठी एक तर ममुराबाद रस्त्याच्या पुलावरुन आणि सुरत रेल्वे गेटला वळसा घालून शहरात यावे लागत आहे.त्यामुळे पेट्रोलचा खर्च वाढला आहे.वेळेचा अपव्यय होत आहे.किमान दहा किलोमिटरचा वळसा घालून यावे लागत आहे. पादचारी रेल्वे रुळावरुन वापर करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिक आपला जीव मुठीत धरुन रुळावरुन मार्गक्रमण करीत असल्याने नाहक त्रास होत असल्याच्या तीव्र भावना व्यक्त करुन पुलाचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी नागरिकांनी केली.नागरिकांनी आंदोलन देखील केले होते. पर्यायी रस्त्यासाठी मनपा प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाने पाहणी देखील केली होती. मनपा सत्ताधार्‍यांनी आणि शहराचे आमदार राजूमामा भोळे,खासदार उन्मेश पाटील यांनी केवळ आश्‍वासन देवून नागरिकांची चक्क दिशाभूल केली आहे.

प्रभाग 1 मध्ये उपमहापौरांसह अधिकार्‍यांनी केली पाहणी
दैनिक जनशक्तिने प्रभाग 1 मधील नागरी समस्यांबद्दल लक्ष वेधले. त्यानुसार उपमहापौर सुनील खडके यांच्यासह मनपाच्या अधिकार्‍यांनी पाहणी करुन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.रस्त्यांवर पडलेल्या मोठ मोठया खडडयांसह, पाईपलाईन अभावी पाण्यासाठी होणारी वणवण, पक्क्या गटारींचा अभाव, रस्त्यांवर साचणारे सांडपाणी, बंद स्ट्रीट लाईट इत्यादी स्वरुपाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या प्रभाग 1 मधील नागरिकांनी उपमहापौरांकडे आपली गार्‍हाणी मांडली. अमृत योजनेच्या कामाबददल स्थानिक नगरसेवक व नागरीकांनी प्रचंड रोष व्यक्त केला. प्रकल्प अभियंता यांनी दिलेल्या माहितीनुसार 70% काम कागदोपत्री झाल्याचे सांगितले. परंतू प्रत्यक्षात तितके काम झालेले नसल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. नविन कॉलन्यांमध्ये तर ही योजना कागदावर देखील आलेली नसल्याचे आढळले.

शहरातील मूलभूत नागरी सुविधांची स्थिती जाणून घेण्यासाठी उपमहापौर सुनिल खडके यांनी सोमवारी प्रभाग 1 मधील दुध फेडरेशन परिसर, रमाई नगर, राजमालती नगर, राधाकृष्ण नगर, धनाजी काळे नगर, कानळदा रोड, टी पॉईट, के.सी.पार्क जवळचा भाग या भागाचा उपमहापौरांनी संबंधीत प्रमुख अधिकार्‍यांसह दौरा केला. शिवाजी नगर मेन रोडवरील श्री.साईबाबा मंदिरापासून दौर्‍याला सुरुवात झाली.महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती रंजना भरत सपकाळे, विधी समिती सभापती अ‍ॅङ. शुचिता हाडा, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, स्वच्छता समिती सभापती चेतन सनकत, नगरसेविका गायत्री राणे, दिपमाला काळे, मिनाक्षी पाटील यांच्यासह स्थानिक नगरसेवक अ‍ॅङ दिलीप पोकळे, सरिता नेरकर, प्रिया जोहरे, रुकसानाबी गबलू खान, शहर अभियंता अरविंद भोसले, पाणी पुरवठा अभियंता सुशिल साळुंखे, प्रभाग अधिकारी, व्ही.ओ.सोनवणी, प्रकल्प अभियंता योगेश बोरोले, नगररचना सहाय्यक प्रसाद पुराणिक शाखा अभियंता संजय पाटील, सुनिल तायडे, किरण मोरे, मुख्य स्वच्छता निरिक्षक एस.टी. अत्तरदे इ. अधिकारी यावेळी उपस्थित होते.