‘व्हीएमडी’ पोल कारवाई चुकीची

0

पुणे।स्मार्ट सिटीच्यावतीने शहरातील विविध चौकांमध्ये उभारण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनबाबत (व्हीएमडी) मुख्यसभेत दिलेल्या उत्तरावरून महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या हे ‘व्हीएमडी’ सामाजिक संदेशांसाठी वापरले जात असल्याने त्यांना ‘स्ट्रीट फर्निचर’ म्हणून गृहीत धरावे. ज्यावेळी त्यावर व्यावसायिक जाहिराती सुरू केल्या जातील, त्यावेळी आकाशचिन्ह परवाना विभागाची परवानगी घ्यावी, असा निर्णय तत्कालिन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिल्याचा खुलासा स्मार्ट सिटी कंपनीने सध्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पाठवला आहे.

विविध चौकांमध्ये उभारलेल्या ‘व्हीएमडी’ या बेकायदेशीर असून, जाहिरात धोरणाचे निकष डावलून त्यांचा वापर केला जात असल्याची टीका मागील आठवड्यात झालेल्या मुख्यसभेत विरोधी पक्षांनी केली होती. याप्रकरणी चौकशी करून स्मार्ट सिटीकडून खुलासा मागविण्यात येईल. त्यामध्ये काही चुकीचे आढळल्यास ‘व्हीएमडी’ काढून टाकण्यात येतील, असे आश्‍वासन राव यांनी दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी तीन दिवसांपूर्वी स्मार्ट सिटी कंपनीला पत्र पाठवून लेखी खुलासा मागवला. ‘व्हीएमडी’ जाहिरात धोरणाचे पालन करत नसल्यास त्या काढून टाकण्यात येईल, अशी तंबीही या पत्राद्वारे दिली होती.

आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
बैठकांमध्ये घेतलेले सर्व निर्णयांची माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांना आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीने उभारलेल्या ‘व्हीएमडी’ या व्यावसायिक नसून ‘स्ट्रीट फर्निचर’मध्ये येत असल्याने जाहिरात नियमावलीचा भंग होत नसल्याचे या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे आता यावर महापालिका आयुक्त काय निर्णय घेणार याविषयी उत्सुकता आहे.

महापालिका आयुक्तांच्या या पत्रावर स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ राजेंद्र जगताप यांनी सविस्तर स्पष्टीकरण करणारे पत्र आणि यासंदर्भातील कागदपत्र महापालिकेला दिले आहेत. त्यामध्ये स्मार्ट सिटी कंपनीचे 34 प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यामध्ये स्मार्ट एलिमेंटस अंतर्गत ‘व्हीएमडी’ बसविण्याचा निर्णय दीड वर्षांपूर्वी झाला. त्यानुसार 161 ठिकाणी ‘व्हीएमडी’ बसविण्याला मंजुरी देण्यात आली. स्मार्ट सिटीकडील सल्लागार कंपनीचे प्रतिनिधी, महापालिकेचे पथ विभागाच्या अधिकार्‍यांनी संयुक्तपणे पाहाणी करून जागा निश्‍चित करूनच ‘व्हीएमडी’ उभारल्या आहेत. त्याचे रेखाटनही महापालिकेकडे मान्यतेसाठी पाठवले आहे. यावर्षी 16 फेब्रुवारीला झालेल्या कंपनी संचालकांच्या बैठकीमध्ये तत्कालिन आयुक्त आणि स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ कुणाल कुमार यांनी ‘व्हीएमडी’वर व्यावसायिक जाहिरात करण्यास महापालिकेचा आकाशचिन्ह विभाग परवानगी देण्याचा विचार करत असल्याचे सांगितले होते. त्यानुसार 19 मार्चला आकाशचिन्ह विभागाला परवानगी मागणारे पत्रही पाठवल्याचे जगताप यांनी नमूद केले आहे.