मुंबई । व्हीजेटीआय येथील मुलींच्या वसतीगृहाच्या नियमांतर्गत वसतीगृहात कोणाही पुरुष व्यक्तीस प्रवेश निषिद्ध आहे. असे असतानाही मागील आठवड्यात संस्थेच्या एका पुरुष वरिष्ठ प्राध्यापक व माजी मुख्याध्यापक रेक्टर यांनी कुठलीही परवानगी न घेता मुलींच्या वसतीगृहात थेट चौथ्या मजल्यापर्यंत प्रवेश केला. इतकेच नव्हे तर तेथे जाऊन मुलींना दमदाटी केल्याचा प्रकारही घडला. नियामक मंडळाने संस्थेच्या महिला अन्याय चौकशी समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षक सेनेने राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना पत्र लिहून तक्रारही केली आहे.
पुरुष प्राध्यापकाची पाठराखण
या संस्थेच्या महिला अन्याय चौकशी समितीमार्फत चौकशीत पुरुष प्राध्यापकास अभय दिले जात आहे. सदर पुरुष प्राध्यापकाच्या वरिष्ठ पदाचा धाक दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. तक्रारदार महिलेने या संदर्भात महारष्ट्र राज्य शिक्षक सेनेकडे तक्रार केली आहे. या घटनेनंतर वसतीगृहातील सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यासंबंधी महारष्ट्र राज्य शिक्षक सेनेने उच्च तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना पत्र लिहिले आहे.